You are currently viewing साहित्यिका सौ.किरण चौधरी लिखित “लेखमंजिरी” चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

साहित्यिका सौ.किरण चौधरी लिखित “लेखमंजिरी” चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

*दै. देशोन्नती तर्फे “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार” ने ही केलं सन्मानित*

 

गडचिरोली : दै. देशोन्नती “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार” व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सौ. किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’ या ४५ लेखांच्या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन २३ ऑगस्ट २०२६ रोजी सुमानंद भवन, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

निसर्ग, स्त्री जाणीवा, सामाजिक प्रश्न, ऐतिहासिक संदर्भ, संतपरंपरा, वैचारिक आणि सामाजिक विषय अशा विविध विषयांना स्पर्श करणारे ४५ लेख या संग्रहात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांच्या मनात विचारांची नवी पालवी फुलविण्याबरोबरच समाजातील विविध प्रश्नांकडे संवेदनशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या लेखांमधून करण्यात आला आहे.

दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ या लोकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या लेखांना पुस्तकाच्या रूपाने एकत्रित करण्याचा हा प्रयत्न असून, ‘लेखमंजिरी’ हा लेखिकेच्या लेखनप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या पुस्तकाला दैनिक देशोन्नती ‘मनस्विनी’चे संपादक मा. प्रा. अनिल पाटील धामोडे यांची प्रस्तावना लाभली असून, ज्येष्ठ कवी व समीक्षक मा. विनोद नवघडे यांनी पुस्तकाच्या आशयाला योग्य शब्दांत अधोरेखित केले आहे.

विशेष योगायोग म्हणजे याच दिवशी दैनिक देशोन्नती ‘मनस्विनी’चा श्रावणी सोहळा आणि लेखिकेचे पती श्री. महादेव चौधरी यांचा वाढदिवसही होता. त्यामुळे हा दिवस लेखिका आणि त्यांच्या कुटुंबासाठी तसेच साहित्यप्रेमींसाठी विशेष आनंदाचा ठरला.

‘लेखमंजिरी’ हे केवळ लेखांचे संकलन नसून, अनुभव, संवेदना, सामाजिक भान आणि वैचारिक चिंतन यांची सुंदर गुंफण असल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

१६० पृष्ठे, ४५ लेख आणि २५० रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मराठी साहित्यप्रेमींनी *‘लेखमंजिरी’* चे आवर्जून वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार विधानसभाक्षेत्र मा. रामदास मसराम, मुख्य दै. देशोन्नती संपादक व शेतकरी नेते लोकनेते मा, प्रकाशभाऊ पोहरे, मा. प्रा. अनिल धामोडे, मनस्विनी संयोजिका सुलभा धामोडे, प्राचार्य नरेंद्र आरेकर, महादेव चौधरी आदी उपस्थित होते. विशेष उपस्थिती, सर्वांचे लक्ष केंद्रित करणारी इंडियन आयडल फायनलीस्ट गायिका भाग्यश्री टिकले, यांच्या गायनाने सर्वांचे लक्ष वेधले.

या प्रकाशन सोहळ्यामुळे सौ. किरण महादेव चौधरी यांच्या साहित्यिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेला असून, त्यांच्या लेखणीचा हा प्रवास यापुढेही अधिक समृद्ध होत राहो, अशा शुभेच्छा साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा