You are currently viewing नाते भावंडांचे

नाते भावंडांचे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी कोल्हटकर “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*

 

*नाते भावंडांचे*

 

अतूट नात्याचा गहिवर जिथे मनी दाटतो, सर्वात जवळचे सहोदर – एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले आणि आत्मियतेचे असे हे नाते. श्रावणांतील पौर्णिमा ही नारळीपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. राखीपौर्णिमा, रक्षाबंधन असेही या सणाला संबोधले जाते. “भाऊ-भाऊ, बहिण-भाऊ, बहिणी-बहिणी एकमेकांची भावंडे आम्ही” अशी एक तालबद्ध लय प्रत्येकाच्या मनांत असते. आयुष्यांतील वीस-बावीस वर्षेच फक्त एकत्र रहायला मिळते. नंतर कोणी नोकरीसाठी, घरांपासून, गांवापासून, देशापासूनही लांब रहातात. बालपणीच्या खोड्या, दंगा नेहमी आठवत रहातो. प्रत्येकजण आपपल्या संसारांत व्यस्त झाले तरी, ओढ कायम रहाते. लहानपणी सुद्धा आईवडील रागावले की, हीच भावंडे एकत्र येतात.

वाढत्या वयांत ज्या गोष्टी आई-वडिलां समोर भितीपोटी किंवा धाकापोटी बोलल्या जात नाहीत ते सगळं बहिण-भावंडांना मात्र माहिती असते. त्या वयांत एक चांगलं मैत्रीचं नातं तयार होतं. पौराणिक परंपरेतील आख्यायिका अशी आहे की, इंद्राणीने इंद्रदेवाच्या रक्षणासाठी श्रावणी पौर्णिमेला हा धागा बांधला होता. दुसरे म्हणजे मध्ययुगीन कालखंडात सामाजिक ऐक्य, रक्षण आणि राजकीय बांधिलकीचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्वाचा मानला गेला.

“माहे श्रावणी निसर्ग दर्शवितो अनंतरंग, अर्णवातही पौर्णिमी शांततेचे तरंग”

नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख पारंपारिक आणि सांस्कृतिक सण आहे. या दिवशी जलदेवता आणि समुद्रदेवतेचे पूजन करतात. कोळी बांधवांची ही परंपरा आहे. पावसाळ्यांत समुद्र खवळलेला असतो, मासेमारी बंद असते. पावसाळा संपत आल्यावर समुद्र शांत व्हावा आणि नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून, समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. हा सण मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरवांत मानला जातो. पावसाळयानंतर समुद्रांत होड्यांना जाऊ देण्यासाठी प्रथम समिंदराचा सन्मान करून आशिर्वाद घेतला जातो.

राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना शब्दांच्या लाटांनी मनांत स्वरसंगम साधला तो असा, “मेघाळलेले आकाश देई श्रावणधारांची अनुभूती, सागराच्या गर्जनेतही अथांग अभेद्य प्रिती, पुनवचंद्र हसतो गगनी पाहून भावंडांची नाती, चंदेरी लाटांनी भिजतो साहिल दिसे विलोभनीय जगन्ननिर्मिती.”

 

© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

मोबाईल : ९८३४८२४०१६

शब्दसंख्या – २६६

प्रतिक्रिया व्यक्त करा