रक्षाबंधनाचे औचित्य साधत वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कुडाळ : “राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांच्या वतीने शहरात ‘एक राखी सुरक्षेची’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर हे अभियान आयोजित करण्यात आले होते. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रमुख ठिकाणी वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
कुडाळ येथील पोस्ट ऑफिस चौक येथून या अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतर कुडाळ बस स्थानक, ‘माझं कुडाळ’ सेल्फी पॉईंट आणि एस. आर. एम. कॉलेजजवळील एस. एन. देसाई चौक या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बस चालक, रिक्षाचालक, दुचाकी व चारचाकी चालक तसेच पत्रकारांना पोलिसांनी सुरक्षेची राखी बांधली.
बस स्थानकावरील रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे, वाहनावर वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलताना वाहन न चालवणे आणि रस्त्यावर स्वतःसह इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे, याबाबत वाहनचालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
“रक्षाबंधनाला भावाने बहिणीचे रक्षण करायचे हा संदेश दिला जातो; मात्र वाहतुकीचे नियम पाळल्यास आपण स्वतःचेही रक्षण करू शकतो,” हा विचार या अभियानातून मांडण्यात आला.
“केवळ नियम आहेत म्हणून ते पाळू नका, तर हे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच तयार करण्यात आले आहेत, याची जाणीव ठेवा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केले. “वाहने सावकाश चालवून सुरक्षित रहा, कारण घरी तुमची जवळची माणसे तुमची वाट पाहत असतात,” असा भावनिक संदेशही त्यांनी वाहनचालकांना दिला. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या अभियानावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, ममता जाधव, वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर, शाम भगत, सिद्धेश चिपकर, संदीप वराडकर, महेश जळवी, तसेच वेदिका गावडे, अनिरुद्ध सावर्डे आदी उपस्थित होते. यावेळी ‘साई जळवी फिल्म्स’ टीमचे साई जळवी, ऋचा शिर्के, नेहा चव्हाण आणि ओंकार पालव आदींनीही सहभाग घेतला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुडाळ पोलिसांनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, ‘एक राखी सुरक्षेची’ या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
