You are currently viewing स्मरणरंजन

स्मरणरंजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मेघा अविनाश कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मरणरंजन*

 

Nostalgia… स्मरणरंजन… गतस्मृतीत हरवून जाणं.. भूतकाळातल्या रम्य आठवणींचं दालन समोर खुलं होणं.. एक सुखद अनुभव! खोलवर अंतर्मनात लपून बसलेल्या आठवणी कधी कधी उसळून बाहेर येतात.परत त्या काळात आपल्यासवे घेऊन जातात.परत तो काळ जगणं होतं.

 

दरवळून गेलेला एखादा ओळखीचा गंध.. कानावर पडलेला पण नेहमीच्या वापरात नसलेला एखादा शब्द.. दूरवरून ऐकू येणारे एखाद्या जुन्या गाण्याचे सूर.. पूर्वी कधीतरी आवडणारा पण हल्ली हल्ली खाण्यात न आलेला एखादा पदार्थ, ती चव… कुठलं तरी चित्र.. त्या रेषा, ते कुंचल्याचे फटकारे…. खूप पूर्वी आपण रहात असलेलं घर.. त्या गल्ल्या.. त्या बोळी… ते रस्ते; जुन्या काळात घेऊन जाणारं टाईम मशीन म्हणून यातलं काहीही मनाला चालतं. त्यावर आरूढ होऊन कुठल्या तरी जुन्या आठवणीत घेऊन जातं मन आपल्याला.

असंही नसतं की आताचा काळ भारीच वाईट आहे किंवा तो काळ फारच चांगला होता. उलट कदाचित त्या वेळच्यापेक्षा आता संपन्नता जास्तच आलेली असेल. मनात आणू ते समोर हजर करताही येत असेल. तरीही ‘बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो हा घडीघडी..’ अशी स्थिती होऊन जाते मनाची. का व्हावं असं? त्या काळात जे सहजगत्या, विनासायास, अनुभवाला आलं; त्यामुळे मिळालेल्या आनंदाची किंमत कळायला इतकी वर्ष लोटावी लागत असतील का? की आता त्यातला आनंद समजण्या इतकी प्रगल्भता आली आहे आपल्यात, असं वाटतंय मनाला?…

 

की आता शरीर मन थकलं आहे, त्या वेळची कुठल्याही नव्या अनुभूतीला सामोरं जाण्याची, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्याची ताकद आता उरलेली नाही, एक प्रकारचा निब्बरपणा आला आहे, लवचिकता हरवलीय शरीर-मनाची; ते हरणासारखं चपळतेने धावणं, ते फुलपाखरामागे पळणं, ते धबधब्यासारखं खळाळत हसणं, जमत नाही आता हे जाणवतंय? आणि म्हणून त्या काळात फिरून जाण्याची, परत तो काळ जगण्याची इच्छा होते आहे?… की असं आहे की कठोर वास्तवातून, वर्तमानातून पळून जावंसं वाटतंय मनाला? आणि दोनच वाटा आहेत पळण्याच्या. भविष्यात, जे माहीत नाहीए त्यात… स्वप्नरंजनाच्या माध्यमातून. किंवा भूतकाळात, जे अनुभवलंय…ज्याने ठसा उमटवलाय आयुष्यावर, त्यात स्मरणरंजनाच्या माध्यमातून… आणि मग साध्या सोप्या वाटेवरून ते जातंय भूतकाळात… कारण स्वप्नं बघायची तरी त्यासाठीचे अनुभव, संदर्भ भूतकाळातूनच शोधून आणायला लागतील ना.

कठीण आहे सांगणं!

 

इतकंच खरं आहे,

Sometimes I feel, I want to go back in times.

Not to change things, but to feel a couple of things twice.

Sometimes I feel, I still had there some more time to live.

Not to have a longer life, but to know what I could give

back to life.

…कोण्या अनाम कविने अचूक शब्दांत व्यक्त केल्यात माझ्या भावना भूतकाळात रमण्याबद्दलच्या.

 

– मेघा अविनाश कुळकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा