You are currently viewing सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

*खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली;

*वैभववाडी एस टी स्टॅन्ड सामोरी खड्डे काँक्रिट ने बुजवले

*पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी*

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर शनिवारी झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत अपघातस्थळी स्पीडब्रेकर उभारण्यात आले आहेत. धोकादायक वळणाबाबत सूचना फलक लावण्यासह रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी-झुडपे हटवून वाहनचालकांसाठी ‘व्हिजन क्लिअर’ करण्यात आले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेत खड्डे बुजविणे, रस्त्यांची डागडुजी आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानंतर शनिवारी खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर अपघात घडल्यानंतर राणे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या काही काळात आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या.
*धोकादायक वळणावर ‘सेफ्टी फर्स्ट’*
अपघातप्रवण वळणावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीडब्रेकर बसविण्यात आले आहेत. पुढे धोकादायक वळण असल्याची पूर्वकल्पना वाहनचालकांना मिळावी यासाठी सूचना फलक उभारण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी-झुडपे हटविल्याने वळणावर समोरील रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होणार असून अपघाताचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या आणि रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांनाही वेग देण्यात आला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन खड्डे बुजविणे, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाय करणे आणि वाहनचालकांसाठी आवश्यक सूचना देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
*गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुरक्षित करण्यावर भर*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षित आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रलंबित डागडुजीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावरील अपघातस्थळी झालेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. ‘आदेश कागदावर नाही, थेट रस्त्यावर!’ अशीच या कार्यवाहीची चर्चा होत असून, रस्ते सुरक्षेबाबत प्रशासनाची तत्परता अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा