महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे
सामाजिक व विकासात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे पंचायत समिती सभापती शंकर घारे यांचे आवाहन
वेंगुर्ले
महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधत सामाजिक तसेच विकासात्मक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे यांनी केले.
एकता महिला प्रभाग संघ, तुळसची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला तब्बल ९५० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सभापती शंकर घारे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा माधवी मोरेश्वर गावडे होत्या. सचिव दामिनी दिलीप बर्डे व कोषाध्यक्षा सीमा संतोष परब यांच्यासह व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ, तुळसच्या सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच श्री. नारायण कुंभार, होडावडा सरपंच सौ. रसिका केळुस्कर, वजराट सरपंच सौ. अनन्या पुराणिक, मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, पाल सरपंच सौ. कावेरी गावडे, पाल उपसरपंच सौ. प्रीती गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. कावले, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन श्री. सागर आवळेगावकर, प्रभाग समन्वयक म्हापण सौ. रेखा परुळेकर, रेडी प्रभाग समन्वयक सौ. प्राजक्ता नाईक, झेप महिला प्रभाग संघ, उभादांडा अध्यक्षा सौ. उर्वी गावडे, त्रिवेणी महिला प्रभाग संघ, रेडीचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
महिलांच्या बचत गटांमुळे आर्थिक बचतीसोबतच महिलांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे महिलांनी विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासातही योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सभेला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
