पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
दुसऱ्या टप्यात ९२९ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ५ कोटी ५० लाखाचा निधी वितरीत
सिंधुदुर्ग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरीत करण्यात येत आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ९२९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये शासनाकडून एकूण ५ कोटी ५० लाख ७१ हजार १२८ रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांमधील ६२६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये २ कोटी ६५ लाख ६९ हजार ७०५ रुपये, तर राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांमधील ३०३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये २ कोटी ८५ लाख १ हजार ४२३ रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
यापूर्वी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांमधील १,२४१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५ कोटी ६ लाख ८६ हजार २०८ रुपये, तर राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांमधील ३२८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये २ कोटी ७१ लाख १२ हजार ४३६ रुपये, अशी एकूण १,५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण ३,६९७ पात्र शेतकरी असून, त्यापैकी २,६६८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप १,०२९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असून, शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
