सावंतवाडीत ३० ऑगस्टला विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिर
आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू व राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर करणार तंत्रशुद्ध मार्गदर्शन; शालेय निवड चाचणी स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी आयोजन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू व राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर यांच्या विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.
आगामी काळात होणाऱ्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी हे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना बुद्धिबळातील ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम तसेच स्पर्धेचे अधिकृत नियम याबाबत सखोल व तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आणि राज्य पंच म्हणून बाळकृष्ण पेडणेकर यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने हे शिबिर बुद्धिबळ खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धात्मक बुद्धिबळातील बारकावे समजून घेण्याबरोबरच आगामी निवड चाचणी स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक तयारी करून घेण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ८००७३८२७८३ या क्रमांकावर आपली नावे नोंदवावीत.
