*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माहेर….*
वाऱ्या रे वाऱ्या
जा माझ्या माहेराला
अंगणात माझी माय
घास घाली वासराला
घाल जरा अंगणात
तुझी हलकीच लाट
धाड ना ग मुळ आई
पाहते भावाची वाट
तुळशीच्या वृंदावनी
घालते माय पाणी
आठवण तुझी येते
सांग हळू तिच्या कानी
सांग तिजसी निरोप
होणारं तु आजी बाई
भरली कुस लेकीची
दिस जाता जात नाही
गुपित माझ्या मनीचं
पहिलं सांग आईला
तुझ्या हाताच्या कढीला
डोहाळे लागले वेडीला
अंगणातल्या जाईचा
कधी माळीन गजरा
सुगंध ये घेऊन जरा
मार चार दोन चकरा
वासराचे कान धर
लई अवखळ बाई
किती दिस झाले त्याला
कसं गोंजारलं नाही
*शीला पाटील. चांदवड*
