You are currently viewing घोटगेवाडी दुर्घटनेत निंबाळकरांची ‘रेस्क्यू’ मदत ठरली मोलाची

घोटगेवाडी दुर्घटनेत निंबाळकरांची ‘रेस्क्यू’ मदत ठरली मोलाची

घोटगेवाडी दुर्घटनेत निंबाळकरांची ‘रेस्क्यू’ मदत ठरली मोलाची

दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक व संपूर्ण पथकासह शोधकार्यात सक्रिय सहभाग; बाबल अल्मेडा पथकाकडून विशेष कौतुक

दोडामार्ग :

घोटगेवाडी येथे कॉजव्यावरून दोन जण वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेसाठी आवश्यक साधनांची गरज निर्माण झाली असताना माजी उपसभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि संपूर्ण मनुष्यबळ शोधकार्यासाठी उपलब्ध करून दिले. निंबाळकर यांच्या या तत्पर मदतीमुळे शोधमोहीमेला महत्त्वाचे बळ मिळाले.
सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमचे प्रमुख बाबल अल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील पथक, आंबोली-सांगेली येथील रेस्क्यू टीम, स्थानिक नागरिक तसेच निंबाळकर यांचे पथक शोधकार्यात सहभागी झाले. निंबाळकरांची संपूर्ण टीम सलग दोन दिवस घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्यात सक्रिय होती.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू करताना सुरक्षेच्या दृष्टीने तिलारी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग तसेच तेरवण मेढे उन्नयी बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन रबर बोटी पाण्यात उतरवून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी देखील रबर बोटीतून शोध पथकासोबत सहभागी होत प्रत्यक्ष शोधकार्यात सहभाग घेतला. दोन बोटींच्या सहाय्याने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी शोध घेण्यात आला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकातील सदस्यांनीही शोधकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. यावेळी घोटगेवाडी कॉजव्यापासून अंदाजे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील एका ठिकाणी झाडाला अडकलेल्या अवस्थेत ८ वर्षीय बालकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. मृतदेह बोटीद्वारे किनाऱ्यावर आणण्यात आला व पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र, अजून एका व्यक्तीचा शोध सुरू असल्याने अंधार आणि नदीपात्रातील परिस्थिती लक्षात घेऊन रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे १०.३० वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, अद्याप दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आलेला नाही. शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
बाबल अल्मेडा पथकाकडून निंबाळकरांच्या टीमचे विशेष कौतुक
शोधमोहीमेदरम्यान स्वतःच्या दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमचे प्रमुख बाबल अल्मेडा व त्यांच्या संपूर्ण टीमने राजेंद्र निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.
संकटाच्या प्रसंगी केवळ मदतीचे आवाहन न करता स्वतःच्या साधनांसह घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष शोधकार्यात सहभागी होण्याची निंबाळकरांची भूमिका दोडामार्ग तालुक्यात विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे.

रेस्क्यू बोटींची जबाबदारी जलसंपदा विभागाची
तिलारी धरण, तेरवण मेढे बंधारा आणि या परिसरातील नदीपात्राशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता रेस्क्यू बोटी उपलब्ध करून ठेवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे.
या परिसरात यापूर्वीच कायमस्वरूपी रेस्क्यू बोटी उपलब्ध करून ठेवणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्ष दुर्घटनेच्या वेळी खासगी पातळीवर उपलब्ध झालेल्या बोटींच्या मदतीने शोधमोहीम राबवावी लागली. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीत पुन्हा कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाने या परिसरात कायमस्वरूपी किमान दोन रेस्क्यू बोटी उपलब्ध करून ठेवाव्यात, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यात तिलारी धरण व तेरवण मेढे बंधारा परिसरात पाण्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, रेस्क्यू बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि आवश्यक बचाव साहित्य सज्ज ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जलसंपदा यंत्रणेने घ्यावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

निंबाळकरांच्या तत्परतेचे कौतुक
घोटगेवाडी दुर्घटनेच्या वेळी राजेंद्र निंबाळकर यांनी स्वतःच्या दोन बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि संपूर्ण पथक उपलब्ध करून देत प्रत्यक्ष शोधकार्यात सहभाग घेतला. त्यांच्या या तत्परतेचे रेस्क्यू टीमपासून स्थानिक नागरिकांपर्यंत विशेष कौतुक होत आहे.
मात्र, एखादी दुर्घटना घडल्यानंतर खासगी व्यक्तीने रेस्क्यू बोटी उपलब्ध करून देण्याची वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाने या परिसरातील आपत्कालीन बचाव व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तिलारी धरण व तेरवण मेढे बंधारा परिसरात कायमस्वरूपी किमान दोन रेस्क्यू बोटी उपलब्ध करून ठेवण्याची मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा