You are currently viewing “उद्योग सिंधुदुर्गात, रोजगाराची पहिली संधीही स्थानिकांना द्या; कुणाल किनळेकर”

“उद्योग सिंधुदुर्गात, रोजगाराची पहिली संधीही स्थानिकांना द्या; कुणाल किनळेकर”

“उद्योग सिंधुदुर्गात, रोजगाराची पहिली संधीही स्थानिकांना द्या; कुणाल किनळेकर”

झोया मरीन जहाज बांधणी प्रकल्पाचे स्वागत; प्रकल्प सुरू होण्यापूर्वी स्थानिक युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्याची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ‘झोया मरीन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पर्यावरणपूरक जहाज बांधणी उद्योग प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारामध्ये स्थानिक युवक-युवतींनाच प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
स्थानिकांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण द्या
प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी केवळ कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींच्या हातातून जाऊ नयेत, यासाठी कंपनीच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण (स्किल ट्रेनिंग) उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी किनळेकर यांनी केली.
“स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा”
झोया मरीन प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच रोजगाराच्या बाबतीत स्थानिक युवकांना प्रथम संधी मिळेल, याची योग्य ती व्यवस्था करावी, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.
प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच स्थानिक युवक-युवतींची आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात या प्रकल्पातील रोजगाराच्या संधींसाठी सिंधुदुर्गातील युवक सक्षम ठरतील, असे कुणाल किनळेकर यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचे अभिनंदन; स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणपूरक जहाज बांधणी उद्योगाची सुरुवात होत असल्याबद्दल मनसेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यात आले. “प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या माध्यमातून मिळावा,” अशी अपेक्षा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी व्यक्त केली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा