सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निवारण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘जनहित महापौर आढावा अभियाना’ अंतर्गत आज प्रभाग समिती क्र.2 वॉर्ड क्र. १७ व १९ मध्ये जनसंवाद व पाहणी दौरा पार पडला.
महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे जागीच निराकरण करण्यात आले.
“नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सोडविणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे सांगत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी या उपक्रमाची व्याप्ती स्पष्ट केली. या जनसंवाद बैठकीत नागरिकांनी व नगरसेवकांनी प्रभागातील विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या.
नागरिक व जनप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर महापौरांनी संबंधित विभागांना खालीलप्रमाणे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले:
विश्रामबाग गणपती मंदिरसमोरील खुल्या भूखंड विक्रीबाबत आणि अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश मालमत्ता व नगररचना विभागाला देण्यात आले. तसेच संबंधित भूखंडांवर महापालिकेचे फलक लावण्यात यावेत.
विनापरवाना वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ठेकेदारांना नोटीस काढण्याचे आणि उद्यान विभागामार्फत योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच प्राणमित्र व पक्षीमित्रांची बैठक घेण्याबाबत सूचना दिल्या.
प्रभाग क्र. १७, १८ व १९ मधील अपूर्ण ड्रेनेजची कामे पूर्ण करणे, चेंबर क्लीन व कार्यक्षम करणे, अंकली रोडवरील अडचण दूर करणे, गॅस पाइपलाइनमुळे नुकसान झालेल्या ड्रेनेजची दुरुस्ती करणे तसेच १०० फुटी भागाकरिता नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले.
घंटागाडीच्या फेऱ्या वाढवणे, १९ व १७ मधील पालापाचोळा व गार्डन वेस्ट उचलण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करणे, भटकी जनावरे व कुत्र्यांच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
आठवडी बाजारामध्ये स्वच्छतागृह उभारणे, कार्यालयाच्या आवारात खाऊ गल्ली व कार्यालय पूर्ववत करणे, कचरा उठावासाठी अतिरिक्त मोठी वाहने व शक्तीमान मशिन (वृक्ष तोडणी मशिन) उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सूचित केले.
या पाहणी दौऱ्यात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासोबत सभागृह नेते श्री. संदीप आवटी प्रभाग समिती क्र. 2 सभापती सौ. वैशाली गवळी उपस्थित होते.
तसेच स्थानिक नगरसेवक/नगरसेविका सौ. लक्ष्मण नवलाई (प्रभाग १७ अ), सौ. प्रार्थना शिंदे (प्रभाग १७ ब), सौ. साक्षी बोरगावे (प्रभाग १७ क), सौ. अलका ऐवळे (प्रभाग १९ अ), श्री. सुरेश बंडगर (प्रभाग १९ ब), सौ. किर्ती देशमुख (प्रभाग १९ क) आणि श्री. युवराज गायकवाड (प्रभाग १९ ड) यांनी प्रभागातील प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले.
प्रशासकीय पातळीवर उपायुक्त श्रीम. अश्विनी पाटील, उपायुक्त श्रीम. स्मृती पाटील, उपायुक्त श्रीम. विद्या पाटील, सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. २) सौ. महादेवी कुरणे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. विनायक जाधव, उपअभियंता श्री. मुलानी, उपअभियंता श्री. महेश मदने, शाखा अभियंता श्री. प्रणव खोत, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. याकुब मद्रासी, स्वच्छता अधिकारी श्री. अतुल आठवले, अतिक्रमण अधीक्षक श्री. नागार्जुन मद्रासी, कर सहाय्यक आयुक्त श्री. आकाश डोईफोडे, कर अधीक्षक श्री. वाहिद मुल्ला, नगररचना शाखा अभियंता श्री. अण्णासाहेब मगदूम आणि उद्यान अधीक्षक श्री. गिरीश पाठक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे प्रशासनात गती आणि पारदर्शकता निर्माण होत असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
