फोंडाघाटमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त नागपंचमी उत्साहात
नागदेवतेची पूजा-अर्चा; दूध व लाह्यांचा नैवेद्य, सायंकाळी आरतीनंतर विसर्जन
फोंडाघाट :
श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा योग साधत फोंडाघाटमध्ये नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी श्रद्धेने नागाच्या मूर्तीची पूजा-अर्चा केली.
बाजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांनी आदल्या दिवशीच नागाच्या मूर्ती घरी आणल्या होत्या. सकाळी विधिवत पूजा करून नागदेवतेला दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी जेवणानंतरही नैवेद्य अर्पण करून भाविकांनी मनोभावे नागदेवतेचे पूजन केले.
दिवसभर धार्मिक वातावरणात नागपंचमी साजरी करण्यात आली. सायंकाळी आरती केल्यानंतर नागाच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. फोंडाघाटमध्ये पारंपरिक श्रद्धा व उत्साहाने नागपंचमीचा हा सण साजरा झाला.
