You are currently viewing तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवास आंदुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
Oplus_16908288

तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवास आंदुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ :

तालुका कृषि अधिकारी कार्यालय कुडाळ, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाट आंदुर्ले क्र. १ येथे ‘तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. महोत्सवामध्ये दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच स्थानिक महिला व नागरिकांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला परिसरातील शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रानभाजी महोत्सवाची सुरुवात वृक्षदिंडी व वृक्षारोपणाने केली. तद्नंतर विद्यार्थी यांनी रानभाजी महत्व पटवून सांगणारे पथनाट्य सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध शाळा विकास समितीचे सभापती मा. श्री. तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी शाळकरी विद्यार्थ्यांनी लावलेल्या रानभाजी वनस्पतींच्या विक्री स्टॉल्सना भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर जि. प. सदस्या मा. श्रीम. दिपलक्ष्मी पडते, शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष व पं. स. सदस्य मा. श्री. मंगेश प्रभू, जि. प. सदस्या मा. श्रीम. आरती पाटील, पं. स. सदस्या मा. श्रीम. प्रियांका जळवी, जि. प. सदस्य मा. श्री. रूपेश कानडे, कुडाळ पं. स. चे माजी सभापती मा. श्री. संजय वेंगुर्लेकर व मा. श्री. मोहन सावंत, मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. विजय दळवी, आत्मा सिंधुदुर्ग प्रकल्प उपसंचालक मा. श्रीम. प्रगती तावरे, तालुका कृषी अधिकारी श्री. भास्कर चौगले, गट विकास अधिकारी मा. श्री. प्रविण हिर्लेकर, रानभाजी अभ्यासक मा. श्री. रामचंद्र शृंगारे आणि आंदुर्ले गावचे सरपंच श्री. अक्षय तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील कृषिदूत आणि कृषिकन्या यांनी बनविलेले आकर्षक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शाळकरी मुलांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सांगणारी अप्रतिम दशावतार नाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर रानभाजी अभ्यासक श्री. रामचंद्र शृंगारे यांनी उपस्थितांना रानभाज्यांची ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म आणि संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रानभाज्यांच्या वापरावर भर दिला.

महोत्सवात स्थानिक महिलांनी रानभाज्यांपासून अत्यंत चवदार व पौष्टिक पाककृती तयार करून आपल्या सुगरणपणाचे व कौशल्याचे प्रदर्शन घडवले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आंदुर्ले ग्रामपंचायत सदस्य, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील विद्यार्थी, शाळेचे शिक्षकवृंद व स्थानिक शेतकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवाला परिसरातील महिला, नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा