विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते, हे समजून घेता यावे, या उद्देशाने ‘अमृत’ संस्थेच्या वतीने विटा येथे ‘अमृत सेतू संवाद’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी खानापूर तहसील कार्यालयाला अभ्यासू भेट देत विविध शासकीय विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
यावेळी खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची पद्धत, तहसील कार्यालयातील विविध विभागांची भूमिका तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
नायब तहसीलदार विजय साळुंखे यांनी तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रशासकीय कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर नायब तहसीलदार अभिजित हजारे यांनी पुरवठा विभाग, अभिलेख कक्ष, संजय गांधी विभाग आणि निवडणूक विभाग या महत्त्वाच्या विभागांची कार्यपद्धती, त्यांचे स्वरूप आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच ‘महाविस्तार AI’ ॲप्लिकेशन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी ‘अमृत’चे सांगली जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी ‘अमृत सेतू संवाद’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय कामकाजाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, शासनाची कार्यपद्धती समजावी आणि भविष्यात नागरिकांना सेवा देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची त्यांना प्राथमिक ओळख व्हावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी व शिक्षक वैभव मिरासदार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या विविध विभागांची प्रत्यक्ष माहिती देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल शिक्षक वैभव मिरासदार यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यासू भेटीमुळे ‘शासकीय कार्यालय म्हणजे नेमके काय आणि प्रशासन नागरिकांसाठी कसे कार्य करते?’ याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली.
