कसाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गैरसोय लवकरच होणार दूर
मुंबई-गोवा महामार्गावर पादचारी पूल उभारणीला गती; विद्यार्थी व प्रवासी वर्गातून समाधान
कसाल :
कसाल हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई-गोवा महामार्ग ओलांडताना गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असताना विद्यार्थ्यांना रस्ता उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे ओलांडावा लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी यापूर्वी अनेकदा अपघाताच्या घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या गंभीर समस्येची कसाल हायस्कूलच्या संस्थेने दखल घेत संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला आता यश आले असून, लवकरच कसाल हायस्कूलनजीक मुंबई-गोवा महामार्गावर पादचारी पूल विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
पादचारी पूल उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना होणारी गैरसोय दूर होण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मागणीसाठी संस्थेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल पालक, विद्यार्थी तसेच प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
