*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित लज्जतदार पाककृती*
*न तळलेला दहिवडा*
*साहित्य*_: अर्धी वाटी मूग डाळ ,अर्धी वाटी चवळी, एक मूठ उडीद डाळ ,एक मूठ हरभरा डाळ, एक चमचा मेथी दाणे, कढीपत्ता जिरे, हिंग, हळद ,मीठ, कोथिंबीर ,चाट मसाला, लाल तिखट, दही, मीठ, साखर, आलं पेस्ट
*कृती*_: मुगडाळ, उडीद डाळ ,हरभरा डाळ, चवळी, मेथ्या हे पाच सहा तास स्वच्छ धुऊन घेऊन भिजत ठेवले. नंतर ते सर्व मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये कढीपत्ता व मीठ घालून मिक्सरवर छान बारीक वाटून घेतले. (यामध्ये पाणी न घालता शक्यतो डाळी वाटून घ्यायच्या असतात. त्यासाठी मी यातच मीठ घालून वाटून घेते .म्हणजे त्याचेच पाणी सुटून डाळी नीट वाटल्या जातात .पाणी घालायची गरज पडत नाही. ही एक माझी स्वतःची टीप आहे) नंतर वाटलेल्या डाळीमध्ये जिरे ,कोथिंबीर , हिंग हळद घालून एकाच अँगलने मी खूप वेळ फेटत राहिले. असे पीठ फे टल्यामुळे पीठ खूप हलके होऊन वडे खूप हलके होतात.(तुम्हाला वडे तळून घ्यायचे असेल तरीसुद्धा सोड्याची गरज पडणार नाही. फेटलेले पीठ हलके आहे की नाही ते बघण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या. थोडे पीठ टाकून बघा. जर ते पीठ वर तरंगले तर समजायचे पीठ खूप छान हलके झालेले आहे ही एक माझी दुसरी टीप)…
मला हे दहीवडे न तळता करायचे होते. म्हणून मी विचार करत होते की आता काय करू… तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. म्हणले बघूया तरी आपण असे करून… असे म्हणून मी गॅसवर इडली पात्र ठेवलं आणि तेल लावून चमच्याने एक एक चमचा पीठ इडली पात्रात घालून ते वडे मी वाफवून घेतले. मला वाटले होते बहुतेक वडे घट्ट झाले असतील. पण नाही बघितलं तर खूप छान सॉफ्ट झाले होते. मग काय मला आनंद गगनात मावेनासा झाला…😀.. मग म्हटले चला आता दही करून घेऊयात..
*दही वड्याचे दही*
घरातच छान साईचे दही करून घेतले होते .जरा गोडसरच असल्याने साखर जास्त टाकण्याची गरज पडली नाही.
दही चांगले घुसळून घेतले. त्यामध्ये चवीनुसार सैंधव मीठ, साखर ,आलं पेस्ट घालून नीट मिक्स केले. मस्त दही तयार…😋
एका डिश मध्ये वाफवलेले वडे ठेवले. त्यावर दही घालून वरून लाल तिखट, चाट मसाला ,कोथिंबीर घालून खाण्यासाठी हा न तळलेला वडा म्हणजे दहीवडा तयार… वाव *एकदम टेस्टी आणि मस्त… आणि प्रथिन्यांनी भरपूर असा ,वजन कमी करणाऱ्यांसाठी, शुगर वाल्यांसाठी, पचायलाही हलका असा हा दहिवडा*…👏
हे वडे नुसतेच वाफवलेले जरी चटणी/सॉस सोबत खाल्ले तरी पण मस्त लागते.
मग करून बघणार ना कसा वाटला तेही सांगा.
सौ संध्या कुलकर्णी…सातारा
