You are currently viewing मालवण नगरपालिका निवडणूक आघाडी म्हणूनच लढणार

मालवण नगरपालिका निवडणूक आघाडी म्हणूनच लढणार

प्रदेश चिटणीस व्हिक्टर डांटस

मालवण

राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मालवण तालुक्यात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिंब्यावर विजयी होत लोकहिताची कामे करत आहेत. आगामी मालवण पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. चार ते पाच जागांवर आमची दावेदारी असून या जागांवर विजय मिळविणे हेच ध्येय असेल, त्यासाठी आगामी काळात अधिक जोमाने काम करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी अधिक सक्षमपणे शहरात कार्यरत राहील, असा विश्वास प्रदेश चिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डांटस यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.

मालवण येथील हॉटेल चिवला येथे मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, जयंतराव पाटकर, शहर अध्यक्ष आगोस्तीन डिसोझा, पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, सदानंद मालंडकर, बाबू डायस, योगेश वराडकर, राजेंद्र वराडकर, किरण रावले, सूर्यकांत दाभोलकर, सलीम खान, भन्नाल डिसोझा, मरिना फर्नांडिस, सारिका डायस, शामिला फर्नाडिस उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. साठे यांनी तालुकास्तरावरील विविध विभागातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघ महिला तालुकाध्यक्ष पदी सदफ खटखटे यांना नियुक्ती देण्यात आली. तर युवती तालुकाध्यक्ष पदी नम्रता चव्हाण, अल्पसंख्याक महिला समन्वयक मरिना फर्नांडिस, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर, सहकार विभाग तालुकाध्यक्ष पदी विनोद आळवे, कृषी विभाग किरण रावले, व्यापार विभाग सूर्यकांत दाभोलकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा व्हिक्टर डाँटस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित युवती व महिला कार्यकर्त्यांचा सदफ खटखटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी व्हिक्टर डाँटस म्हणाले, केवळ पदे घेऊन आपण स्वस्थ बसता नये. या पदांचा वापर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, न्याय हक्कासाठी झाला पाहिजे. जिल्हा नियोजन तसेच राष्ट्रवादी आमदारांच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होईल त्यातून मालवण शहरासह तालुक्यात समाज हिताची कामे करण्याचा आपला प्रयत्न राहील. मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी राष्ट्रवादी तत्पर असल्याचे व्हिक्टर डाँटस यांनी सांगितले.

सोडून गेलेल्यांचा विचार नको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हावर निवडणूक लढवून जनतेच्या पाठिंब्यावर विजयी झाल्यानंतर जी माणसे पक्ष सोडून गेली त्यांचा विचार करत बसण्याची गरज नाही. आपल्या सोबत असलेले प्रामाणिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचा विचार मानणारी जनता यांना सोबत घेऊन मालवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करूया. आगामी नगरपालिका निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गमिनी कावा तत्वानुसार कार्यकर्त्यांची मोठी फौज नसतानाही आपल्या वाट्याला येणाऱ्या चार ते पाच जागांवर विजय मिळविलाच पाहिजे, हेच आपले ध्येय ठेवूया, अशी भूमिका व्हिक्टर डाँटस यांनी स्पष्ट केली.

मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विविध विभागातील तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करून त्यांचे अभिनंदन प्रदेश चिटणीस व्हिक्टर डाँटस, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा