स्तनपान सप्ताहानिमित्त गरोदर माता व पालकांना मार्गदर्शन
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाचा स्तुत्य उपक्रम; मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले
स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने शिवाजी प्रागतिक शाळेत गरोदर माता, माता व पालकांसाठी स्तनपान तसेच मातृ-बाल आरोग्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि मातांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमासाठी डॉ. सौ. अश्विनी माईणकर यांना विशेष मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थित मातांना स्तनपानाचे महत्त्व, नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आईच्या दुधाचे असलेले महत्त्व, बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, तसेच स्तनपान करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच गरोदरपणात मातांनी आहार, आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
आईचे दूध हे नवजात बालकासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून बालकाला आवश्यक पोषण मिळण्याबरोबरच त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे बाळाच्या सुरुवातीच्या काळात स्तनपानाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे डॉ. माईणकर यांनी स्पष्ट केले. मातांच्या मनातील स्तनपानासंदर्भातील विविध शंका व प्रश्न जाणून घेत त्यांचे समर्पक निरसनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सेक्रेटरी श्रिया परब, उपाध्यक्षा सई चव्हाण, खजिनदार वृंदा गवंडळकर, माजी अध्यक्षा अपर्णा बोवलेकर, सदस्या रसिका मठकर तसेच अंगणवाडी शिक्षिका स्मिता कोणेकर, मदतनीस अर्पिता जाधव, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
स्तनपानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करून मातांना योग्य आरोग्यविषयक माहिती मिळावी, तसेच माता व बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
इनरव्हील क्लबच्या या जनजागृतीपर उपक्रमाला गरोदर माता, माता व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत मातृ-बाल आरोग्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
