You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा

“स्त्री सक्षमीकरणामध्ये खंबीर मानसिकता महत्त्वाची असते. ती स्वतःची असो, घरातील असो, की समाजातील असो. स्वतःला कमी न लेखता पुरुषाच्या बरोबरीने कार्य करण्याची तयारी ठेवा, सबलीकरणामध्ये इतरांच्या सहकार्यावर विसंबून न राहता स्वतःच्या कौशल्य विकासातून सबल बना.”, असे उद्गार अॅडव्होकेट नीलांगी रांगणेकर -सावंत यांनी काढले. त्या बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “मुलगा हाच वंशाचा कुलदीपक म्हणून त्याचे फाजील लाड करण्याची मानसिकता बदलून मुलगीलाच माया, प्रेम द्या. ती साऱ्या जगाला प्रेम देईल, असे सांगत महिला दिनानिमित्त आयोजित महिलांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू व शोभेच्या वस्तू या प्रदर्शनाचे उद्घाटन करीत या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

 

यावेळी त्यांच्या सोबत तेंडोलीच्या कृषी विस्तार अधिकारी जलाकार, कोव्हिड योद्धा पुरस्कार विजेत्या कल्पना उर्फ रश्मी कुडाळकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, संस्थेच्या व्यवस्थापकीय अधिकारी मर्ल फोनसेका, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी, मानव संसाधन अधिकारी (एच आर ओ) पियुशा प्रभुतेंडोलकर, सेंटर स्कूलच्या प्रियांका सिंह, पल्लवी कामत ,प्रा. चेतन प्रभू, प्रा.अरुण मर्गज,प्रा. परेश धावडे इत्यादी उपस्थित होते. सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून व प्रज्ञा या नवोपक्रम योजनेचा शुभारंभ करून  सुरुवात झालेल्या कार्यक्रमांमध्ये अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या रश्मी कुडाळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये “समाजाची व आपली मानसिकता बदलली तरच महिला सबलीकरणाच्या उपक्रमाला सहकार्य प्राप्त होते.

 

स्वतःला कमी न मानता अबला न समजता आपल्याला  स्वयंसिद्ध करता येते. यासाठी महिलांनी संघटित होण्याची गरज आहे. पारंपरिकतेच्या बंदिस्त कल्पना झुगारून बाहेर पडणे गरजेचे आहे. तरच आपल्या खिशात चार पैसे पडतील. त्यातूनच आपण सन्मानाला व स्वतःच्या विकासाला सक्षम ठरू शकतो “असे उद्गार काढत स्वतःला सिद्ध करण्याबाबतचे आपले अनुभव कथन करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या महिलादिनाचे औचित्य साधून पियुशा प्रभूतेंडोलकर यांनी कौशल्य प्रधान प्रज्ञा उपक्रम या संस्थेमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट कथन करून कौशल्य “प्रधान प्रज्ञा” या उपक्रमांच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण ही केले.

महिलांच्या सबलीकरणासाठी “प्रज्ञा” (PRADNYA ) उपक्रम कशा पद्धतीने कार्य करणार आहे ? याची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी महिलांनी बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तू गृहोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल ही लावण्यात आलेले होते त्याचा उपस्थितांनी लाभ घेतला. महिला दिनाच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा, फोटो स्पर्धा, चारोळी स्पर्धा, “तिला” पत्र स्पर्धा इ.स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.

महिला सबलीकरणासंदर्भात भावना प्रभू व ऋचा कशाळीकर यांनी एक उत्तम रिदमिक ड्रामा  परफॉर्मन्स सादर केला. मुलींच्या वतीने सौ. नागापुरे, कुमारी जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.अरुण मर्गज, कल्पना उर्फ रश्मी कुडाळकर व अॅड. नीलांगी रांगणेकर -सावंत यांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी, सूत्रसंचालन प्रा. परेश धावडे यांनी तर उपस्थितांचे आभार गौतमी मेस्त्री हिने मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =