शिवडाव हायस्कूलच्या शिक्षक रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
१५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा; संदेश सावंत यांची आक्रमक भूमिका
कणकवली :
शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भेट झाली.
यावेळी शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मुकेश पवार, सरपंच नितीश भिसे, शालेय समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शिवडाव हायस्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे, त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम आणि शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
संदेश सावंत यांची आक्रमक भूमिका
शिवडाव हायस्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी संदेश सावंत यांनी यावेळी आक्रमकपणे केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यास विलंब करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
चर्चेनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवडाव हायस्कूलला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शिक्षक समायोजन प्रक्रियेतून शाळेला आवश्यक शिक्षक देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपूर्वी शिवडाव हायस्कूलला आवश्यक शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.
मात्र, अशी वेळ येणार नाही. लवकरच शिवडाव हायस्कूलला शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यावेळी शिवडावचे सरपंच नितीश भिसे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक नाडकर्णी, नितीन गावकर, नितीन हरमलकर, चंदू शिरसाट, अमेय सावंत, विनोद गावकर, मिलिंद गावकर, स्वप्निल वर्धम, शालेय समिती सदस्य गणेश मस्कर, कृष्णा गावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
