डिंगणेचे विलास सावंत ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ने सन्मानित
कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; पुरस्कार कष्टकरी शेतकऱ्यांना समर्पित
बांदा
सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. पुणे येथे आयोजित सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे विलास सावंत हे काजू, आंबा, नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करण्याबरोबरच बचतगटांची स्थापना, ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर “हा सन्मान माझा नसून कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे,” अशी भावना विलास सावंत यांनी व्यक्त केली. भविष्यात ‘कॅश्यू व्हिलेज’ आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
विलास सावंत यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
