ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना
*कधी कळलेच नाही*
पावलांनी किती वाटा नि:शब्द पार केल्या,
कधी कळलेच नाही क्षितिजाशी त्या जुळल्या..
श्वासांच्या वीणेवर काळ अलगद गात राहिला,
कधी कळलेच नाही ऋतूंचा स्वर बदलला..
डोळ्यांतील स्वप्नांना नभाचे पंख लाभले,
कधी कळलेच नाही क्षणपक्षी कधी उडाले..
हिरव्या पानांवरती दवांचे अक्षर विरघळले,
कधी कळलेच नाही आयुष्याचे ऋण वाढले..
विश्वासाच्या दीपाला वादळांनी वेढलेले,
कधी कळलेच नाही धैर्याचे तेज उजळले..
वेदनांच्या मातीतही आशेचे बीज रुजले,
कधी कळलेच नाही फुलांचे हसू फुलले..
आरशाशी बोलताना चेहर्यांचे अर्थ बदलले,
कधी कळलेच नाही अबोल संवाद घडले..
सावल्यांनी सूर्याचे अस्तित्वच जपले,
कधी कळलेच नाही अंधारात दिवे पेटले..
हरवण्याच्या क्षणांनीच मिळवण्याचे धडे दिले,
कधी कळलेच नाही पराभवातून शिखर गवसले..
आज उंबरठ्यावर उभा काळ हसत सांगतो,
कधी कळलेच नाही प्रवासच अंतिम ध्येय ठरतो..
जीवनाच्या ग्रंथातील अखेरचे पान उलगडता,
कधी कळलेच नाही जगणेच कविता होऊन फुलता..
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.
