“पोलीस अधीक्षकांवरील आरोपांचे पुढे काय?; मनसेकडून आमदार निलेश राणेंना जाहीर खुलासा करण्याची मागणी”
“अवैध व्यवसायांवर आळा बसला का? पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे कुणाल किनळेकर यांचे आवाहन”
कणकवली
आमदार निलेश राणे यांनी काही आठवड्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांवर अवैध व्यवसायांना संरक्षण देणे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर दर पंधरा दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे पुरावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सभागृहात उपस्थित केले. मात्र, यापूर्वी स्वतःच पत्रकार परिषदेत गाजावाजा करून उपस्थित केलेला जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा मुद्दा त्यांनी अधिवेशनात मांडला नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर आमदार निलेश राणे यांनी केलेले आरोप जनहितासाठी होते आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाले असतील किंवा त्यावर लक्षणीय प्रमाणात आळा बसला असेल, तर त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी. तसेच पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांचे पुढे नेमके काय झाले, याचाही खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, कणकवलीतील मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतर निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकासंदर्भातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आपल्या मतदारसंघातील अवैध व्यवसायांबाबत आमदार निलेश राणे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे.
