You are currently viewing फळपिक विमा भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा; १० ऑगस्टला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

फळपिक विमा भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा; १० ऑगस्टला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

फळपिक विमा भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा; १० ऑगस्टला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक; तांत्रिक त्रुटी दूर करून विमा भरपाईचा मार्ग मोकळा करण्यावर भर

कणकवली

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिल्याचा मुद्दा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणीही केली होती. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेत ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली.
बैठकीस कृषी सचिव, कृषी आयुक्त, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापक लावण्या मुंडयूर, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सीएससी महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा मनीषा दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत वंचित शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन तांत्रिक त्रुटी दूर करण्याबाबत तसेच पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा