You are currently viewing अटी तिथे सोसायटी

अटी तिथे सोसायटी

*लेखक ऋषिकेश कामत लिखित अप्रतिम लेख*

 

*अटी तिथे सोसायटी*

 

जिथे फार अटी ठेवल्यामुळे सोसावं लागत ती म्हणजे – सोसायटी…

इमारत उभी राहते, तेव्हा फक्त भिंती उभ्या राहत नाहीत; उभा राहतो एक विश्वास. प्रत्येक विटेत एखाद्या कुटुंबाचा घाम असतो, प्रत्येक मजल्यावर एखाद्या आईबापाचं आयुष्यभराचं साठवलेलं भांडवल गुंतलेलं असतं.

पण या विश्वासालाच सर्वप्रथम तडा जातो — आणि तो बाहेरून नाही, तर आतून.

“कालांतराने सोसायटी करा” — हे वाक्य ऐकताना साधं वाटतं. पण खरं पाहिलं, तर हा तो क्षण असतो जिथे स्वप्न आणि वास्तव यांच्यातील पडदा फाटायला सुरुवात होते.

फ्लॅट घेताना आपण स्वप्न विकत घेतो.

सुंदर गार्डन, खेळण्यासाठी जागा, पाण्याची सोय, सुरक्षा…

पण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येतातच असं नाही. आणि जेव्हा त्या येत नाहीत, तेव्हा प्रश्न उभे राहतात.

संघर्ष करण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळ सर्वांकडेच नसतो.

कारण बहुसंख्य लोक जगतात ते शांततेसाठी.

“जाऊदेत,आपलं काम बघायचं की भांडत राहायचं ” — ही मानसिकता त्यांची चूक नाही, कारण वास्तव आणि दाखवलेली स्वप्न याची पडताळणी नीट न करता सदनिका घेणं त्यामुळे ही जबाबदारी शेवटी आपलीच ना .

आणि मग प्रवेश होतो त्या लोकांचा —

जे स्वतःला समाजाचे तारणहार समजतात, पण प्रत्यक्षात ते व्यवस्थेचे व्यापारी असतात.

हे लोक जणू धुरासारखे असतात.

सुरुवातीला दिसत नाहीत, पण एकदा पसरले की संपूर्ण वातावरण व्यापून टाकतात.

किरकोळ गोष्टींना ते ज्वालामुखीचं रूप देतात.

लिफ्ट बंद पडली? — “ही व्यवस्थेची लाज आहे!”

पाणी कमी आलं? — “हा बिल्डरचा घोटाळा आहे!”

आणि मग सुरू होतो आवाज, आरोप, सभा, संदेशांचा पूर…

पण खरी गंमत इथे आहे —

हेच लोक ज्या आगीत तेल ओततात, त्याच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा करतात.

“मी आहे ना, सगळं ठीक करतो…”

या एका वाक्यामागे किती व्यवहार दडलेले असतात, हे सामान्य माणसाला दिसत नाही.

बिल्डरशी गुप्त भेटी, मागच्या दारातून ठरलेले सौदे, आणि वरवर चाललेली लढाई — हा सगळा खेळ असतो.

एकदा का ही आग पेटली, की मग सुरू होतो खरा व्यापार.

“मी सगळ्यांना शांत करतो, पण माझंही बघा…”

हे शब्द नसतात, ही एक बोली असते.

आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो —

शत्रू बाहेर आहे की आपल्या घरातच?

कारण बिल्डर जर चुकीचा असेल, तर तो एकदाच फसवेल.

पण आपल्या घरातलेच काही लोक जर स्वार्थासाठी उभे राहिले, तर ते पुन्हा पुन्हा फसवतील.

काळाच्या ओघात हेच लोक “नेते” बनतात.

लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, कारण ते आवाज करतात.

पण आवाज आणि प्रामाणिकपणा यांचा काहीही संबंध नसतो.

मग सुरू होतो व्यवस्थेचा ऱ्हास.

मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे गोळा होतात, पण कामं अर्धवट राहतात.

दुरुस्तीच्या नावाखाली खर्च दाखवला जातो, पण दर्जा घसरत जातो.

निर्णय घेतले जातात, पण त्यात पारदर्शकता नसते.

आणि हळूहळू —

ती इमारत, जी कधीकाळी स्वप्न होती,

तीच इमारत एक ओझं बनते.

बाल्कनीत उभं राहून बाहेर पाहताना समाधान वाटण्याऐवजी, मनात एकच विचार येतो —

“आपण इथे का आलो?”

पण या सगळ्यात सर्वात वेदनादायक गोष्ट कोणती आहे माहिती आहे?

ती म्हणजे —

आपल्याला सगळं समजत असतं, तरी आपण गप्प बसतो.

हो, आपणच.

ज्यांना चुकीचं दिसतं, पण आवाज उठवत नाहीत.

ज्यांना फसवणूक कळते, पण “नको त्या भानगडीत पडू” म्हणून मागे सरकतात.

ही शांतता म्हणजे समाधान नाही, ही परवानगी आहे — चुकीला वाढण्यासाठी.

मग प्रश्न असा आहे —

आपण खरंच बळी आहोत का, की या व्यवस्थेचे मूक सहकारी?

बिल्डर चुकीचा असू शकतो,

नेते स्वार्थी असू शकतात,

पण आपण जागे नसलो, तर ही साखळी कधीच तुटणार नाही.

घरात जर गळती सुरू झाली असेल, तर बाहेरच्या पावसाला दोष देण्यात अर्थ नाही.

त्या गळतीला थांबवणं गरजेचं आहे.

आज गरज आहे ती फक्त रागाची नाही, तर जागृतीची.

प्रश्न विचारण्याची, उत्तर मागण्याची, आणि योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याची.

प्रत्येक मोठ्याने बोलणारा नेता नसतो,

आणि प्रत्येक शांत राहणारा शहाणा नसतो.

निर्णय तुमचा आहे —

तुम्हाला शांततेच्या नावाखाली हळूहळू सडत जायचं आहे,

की एकदा ठामपणे उभं राहून ही व्यवस्था बदलायची आहे?

कारण लक्षात ठेवा —

इमारती भिंतींनी उभ्या राहत नाहीत, त्या उभ्या राहतात माणसांच्या प्रामाणिकपणावर.

आणि जेव्हा तोच प्रामाणिकपणा ढासळतो, तेव्हा सर्वात मजबूत भिंतही कोसळायला वेळ लागत नाही.

ही केवळ एक गोष्ट नाही,

ही एक आरसा आहे —

ज्यात प्रत्येकाने स्वतःकडे पाहण्याची गरज आहे.

 

✍️ ऋषिकेश कामत, रत्नागिरी

प्रतिक्रिया व्यक्त करा