*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋणानुबंध*
(वृत्त लवंगलता ८+८+८+४)
प्रारब्धाने रेषा जुळता भाग्य योग हा आला
दोन मनांचे मीलन होता साज सुखाचा खुलला.
सुखदुःखाचे डोंगर चढता भक्कम सोबत होती
दिवस कंठता भल्याबुऱ्याची प्रचिती आली होती
कधी मनाचे सूर बिनसले अबोल क्षणही आले
डोळ्यांमधला एक इशारा स्मित गालावर फुलले
कधी मनाला रुखरुख लागे शब्द उणेही गेले
रुसवाफुगवा काढायाला नामी युक्ती चाले
मतभेदाचे क्षण येताना स्वर काहीसे चढती
समजूतीची एक मिठी अन् वादच सारे मिटती
विश्वासाच्या धाग्यांनी तर रज्जू अधिकच जुळले
प्रेमसरींच्या शिंपणातुनी जीवन सुंदर फुलले
आशावादी सकाळ हलके हास्य घेउनी येते
संध्याकाळी सुखसौख्याचे गाणे मनात गाते
ऋतू बदलता दिन सरताना वेळ भराभर जाई
परस्परांची साथ लाभता क्षणही फुलुनी येई
काळजातली मंगल स्वप्ने सत्यरुपाला आली
युगायुगांच्या ऋणानुबंधा अशी बळकटी आली
©️®️डॉ मानसी पाटील
