You are currently viewing आषाढ मास

आषाढ मास

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक ज्येष्ठ मालवणी साहित्यिक श्री विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

*आषाढ मास*

 

आषाढ महिना संपत आलाय. हा महिना मला नेहमीच संभ्रमित करत आला आहे. माझी आई आषाढाला ‘आशाड आणि वशाड’ म्हणायची. म्हणजे तसा तिला तो नको असलेला महिना असायचा.

 

आर्दा नक्षत्राचा भरपूर पाऊस, घरात सगळीकडे गळणं, कपडे न सुकणे, बाजारात मंदी, हातात चलन नाही अश्या सगळ्या गोष्टीमुळे ती त्याला वशाड म्हणत असावी. आषाढातली कांदेनवमी आणि गटारी हे देखील आषाढाचे मार्क्स कमी करणारे किंवा गुण उधळणारे दिवस आहेत. पुढे येणाऱ्या श्रावण महिन्याचा पॅरामीटर लावल्यामुळे देखील कदाचित आषाढाला वाईट म्हणत असावेत.

 

त्या काळातील आम्हा मुलांसाठी आषाढातली एकमेव आनंददायी बाब म्हणजे आरवलीच्या वेतोबाचा हरीनाम सप्ताह. आषाढी एकादशीला त्याचा चौथा दिवस येतो.त्यादिवशी आम्ही आरवलीत चालत जात असू. चित्रकार गुरू चिपकरांची मंदिरातील अप्रतिम रांगोळी हे खास आकर्षण होते. तरीही चालण्याचा त्रास, भिजायला होणे हे वैताग होतेच. बालपणीचे सुसंस्कार मात्र मिटत नाहीत. वाहनांची उपलब्धता असतानाही मी आजही आषाढीला आरवलीत चालत जातो,चालत येतो.

 

आता परिस्थिती बदललीय. स्लॅबची घरे झाल्यामुळे लोकांना पावसाचा त्रास होत नाही. घरात वॉशिंग मशीन असते, कपडे सुकण्याचा त्रास नाही. रेनकोट आहेत, भिजण्याचा त्रास नाही आणि शेतीत खूपच कमी लोक जातात, तिथेही तसा त्रास नाही. आषाढाचं वशाडपण बर्‍यापैकी कमी झालंय.

 

मलाही यथावकाश समज आली. आषाढातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कालिदास आठवू लागले. गुरुपौर्णिमा खुणावू लागली. पंढरपूर वारीचा सोहळा अनुभवू लागलो. आषाढासंबंधीचे सर्व गैरसमज आता दूर झाले आहेत. या महिन्यात मेघदूत आठवत रहाते, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो भाव, ती परंपरा मला अनुभवता येते. पंढरपूर यात्रेविषयी तर काय बोलू? घाटमाथ्यावरचा टाळ मृदुंगाचा आवाज इथे कोकणच्या कानात घुमू लागतो अन् तोच नाद हळूच श्रावणाचा हात धरून आपल्याकडे येतो. आषाढ आता माझा जीवलग झालाय.

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा