विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राजू मसुरकर यांनी घेतली सदिच्छा भेट; सिंधुदुर्गच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन
रोजगार, आरोग्य, पर्यटन, डॉक्टरांचे मानधन, टेंबे स्वामी तीर्थक्षेत्र विकास आणि आपत्ती विमा यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती तथा सावंतवाडीचे सुपुत्र राहुल नार्वेकर हे सावंतवाडीतील त्यांच्या निवासस्थानी आले असता जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विविध मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.
यावेळी संस्थानचे युवराज लखनराजे सावंत भोसले, भाजप नेते दिलीप भालेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, भाजप संयोजक नागेश जगताप, महेश बांदेकर, सुदेश नेवगी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू मसुरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकासाला चालना देण्याची गरज मांडली. पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अधिक प्रोत्साहन देत उद्योगांना करसवलती मिळाल्यास स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
याशिवाय राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, गोव्याच्या धर्तीवर उद्योगांना प्रोत्साहन, टेंबे स्वामी महाराजांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर प्रचार करून धार्मिक पर्यटन वाढविणे, तसेच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या विकासाला गती देण्याची मागणीही करण्यात आली.
तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना अधिक प्रभावी आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी घरपट्टीसोबत अल्प विमा प्रीमियम आकारून राज्यस्तरीय विमा योजना राबविण्याचा प्रस्तावही मसुरकर यांनी मांडला.
राहुल नार्वेकर यांनी निवेदनातील मुद्दे लक्षपूर्वक ऐकून त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.
