You are currently viewing केर–भेकुर्लीतील एम-सॅन्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

केर–भेकुर्लीतील एम-सॅन्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

केर–भेकुर्लीतील एम-सॅन्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

“गावचा डोंगर आणि समृद्ध जंगल वाचवा”; प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी, लोकप्रतिनिधींनाही साकडे

दोडामार्ग
केर–भेकुर्ली गावालगत प्रस्तावित एम-सॅन्ड (M-Sand) प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, गावालगतचे समृद्ध जंगल उद्ध्वस्त करून हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार गुरुवारी व्यक्त केला. गावाचा डोंगर ही नैसर्गिक संपत्ती असून, परिसराचे निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण भागाचे जीवनमान अबाधित ठेवण्यासाठी हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
केर गावातील डोंगररांगा आणि निसर्गसंपन्न परिसर ही या भागाची ओळख आहे. प्रस्तावित एम-सॅन्ड प्रकल्पामुळे जंगलाचा विनाश होऊन पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीच ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
निसर्ग संवर्धनाबरोबरच स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान सुरक्षित ठेवणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्याकडेही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना डावलून प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही केर–भेकुर्ली ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा