You are currently viewing सावंतवाडी रोड स्थानकावर राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

सावंतवाडी रोड स्थानकावर राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

सावंतवाडी रोड स्थानकावर राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

थांबा पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रेल्वेचे पूजन, चालकांचा सत्कार आणि पेढे वाटून आनंदोत्सव

सावंतवाडी :

सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकाला पुन्हा राजधानी एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्यानंतर बुधवारी या गाडीचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचे पूजन, पुष्पहार अर्पण, चालकांचा सत्कार आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी सुमारे ९.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात दाखल होताच प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात तिचे स्वागत केले. यावेळी रेल्वेचे विधिवत पूजन करण्यात आले तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले की, कोरोनाकाळात राजधानी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता. संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राजधानी एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस तसेच मंगळूरू एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्यात यश मिळाले. या यशासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव देण्यात आले असून, त्या नावाला साजेशा आधुनिक प्रवासी सुविधा आणि विकासकामे भविष्यात येथे व्हावीत, अशी अपेक्षाही मठकर यांनी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा