You are currently viewing बांदा–बोरिवली एसटी सेवा तात्काळ सुरू करा; बांदा–ठाणे थेट बसचीही मागणी

बांदा–बोरिवली एसटी सेवा तात्काळ सुरू करा; बांदा–ठाणे थेट बसचीही मागणी

बांदा–बोरिवली एसटी सेवा तात्काळ सुरू करा; बांदा–ठाणे थेट बसचीही मागणी

जि.प. सदस्य नितीन राऊळ यांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन; गणेशोत्सवापूर्वी निर्णय घेण्याची अपेक्षा

बांदा

गोवा सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असलेल्या बांदा येथून मुंबईकडे धावणारी बंद झालेली बांदा–बोरिवली एसटी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, तसेच बांदा–ठाणे थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कणकवली आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली.
आगार व्यवस्थापक निवास कदम यांना निवेदन सादर करण्यात आले असून राज्याचे परिवहन मंत्री यांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इन्सुली, डेगवे, वाफोली, कास, निगुडे, शेर्ले, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, मोरगाव, पडवे, माजगाव, विलवडे आणि मडुरा आदी गावांतील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी बांदा येथे येतात. या भागातील हजारो चाकरमानी मुंबई, ठाणे, बोरिवली आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असून सण-उत्सवांच्या काळात गावाकडे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशावेळी एसटीची थेट बस सेवा ही सर्वसामान्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था ठरते.
पूर्वी सुरू असलेल्या बांदा–बोरिवली बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आणि समाधानकारक प्रवासी भारमान असूनही कोणतेही ठोस कारण न देता ती सेवा बंद करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत असून सध्या सावंतवाडी, कणकवली किंवा कुडाळ येथे जाऊन बस पकडावी लागत असल्याने अतिरिक्त वेळ, खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच बांदा–ठाणे थेट बस सेवेलाही मोठी मागणी असून ती सुरू झाल्यास मुंबई महानगर परिसरात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याने सामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा–बोरिवली बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याबरोबरच बांदा–ठाणे बस सेवा सुरू करावी आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्यासह कासचे सरपंच प्रवीण पंडित, सागर राणे, संतोष राणे आदी उपस्थित होते. प्रवाशांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा