You are currently viewing माजी कुलगुरू स्व. दादासाहेब काळमेघ एक पुण्यस्मरण

माजी कुलगुरू स्व. दादासाहेब काळमेघ एक पुण्यस्मरण

29 जुलै पुण्यतिथीनिमित्त

============

माजी कुलगुरू स्व. दादासाहेब काळमेघ एक पुण्यस्मरण

============

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मु-हा देवीचे हे माझे गाव. दादासाहेब काळमेघांच्या चौसाळा या गावावरून गावावरून शॉर्टकटने दहा-बारा किलोमीटर अंतरावर .

दादासाहेब नेहमीच या आमच्या गावात यायचे .कारण त्यांचे वडील आणि माझे वडील एकेकाळी येथेच मजुरी करीत असत. श्री किसनराव बोंद्रे यांच्या खटल्यात रोजंदारीने काम करीत असत.दादासाहेब लहानपणी इथेच मु-हा येथे काही काळ राहिले आहेत. म्हणून या गावाविषयी आणि या गावातील एकवीरा देवीच्या संस्थानाविषयी त्यांना खूप लडा होता .त्या निमित्ताने का होईना पण ते मु-हा येथे आले आणि मी त्यांना घरी बोलाविलं तर ते न बोलाविता यायचे .

एकदा ते असेच माझ्या घरी आले. माझ्याकडे बघितलं. विचारणा केली. काय सुरू आहे . मी तेव्हा विद्यार्थी होतो. मी म्हटले. काही नाही. मी पुढे सांगितले. अंजनगावच्या सारडा कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटी आर्ट पास झालो. त्यांनी लगेच टक्केवारी विचारली. मी त्यांना सांगितली .तृतीय श्रेणी. ते नाराज झाले. चेहरा किंचित रागावल्यासारखा झाला. का बरं .आता मी बोलणार नव्हतो. पण माझे वडीलच म्हणाले .परिस्थिती वाईट असल्यामुळे आम्ही त्यालाच आम्ही कॉलेज सोडून मजुरीला पाठवतो. वर्षभर तो कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. वडील दादा साहेबांना म्हणाले. दादा गरिबाच्या लेकराले कुठे नोकरी लागत असेल तर पहा.वगैरे वगैरे बरंच काही माझे वडील बोलून गेले. दादा ऐकत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आणि विचारलं .मॅट्रिकला तुला पर्सेंटेज किती आहे. मला विचारणा केली .मी सांगितल़े. वर्गातून पहिला .मी प्रथम श्रेणीमध्ये मॅट्रिकची परीक्षा बजरंग विद्यालय चिंचोली या शाळेतून उत्तीर्ण झालो. ते हसले. त्यांचा चेहरा फुलला. त्यांनी सांगितले .हिम्मत सोडू नको .नेहमी कॉलेजमध्ये जात जा .कॉलेज आपले आहे. श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य महाविद्यालय अंजनगाव सुर्जी. मी होकार दिला .वडिलांनी पुन्हा थोडीशी नाराजी आणि शंकेचा सूर काढला. पण दादा शिकून काय करायचं. दादा हसले .असं बोलून कसं चालेल. तो विचार केला असता तर आम्ही शिकलोच नसतो. पूर्णपणे दादांनी माझ्या वडिलांना समजून सांगितले. वडिलांना पटले आणि नंतर मी नियमितपणे शाळेत जाऊ लागलो .

पुन्हा एकदा अशीच अडचण आली .तेव्हा मी त्यांना नागपूरला जाऊन भेटलो .त्यांना बरं वाटलं. समाधान झाले.. त्यांनी समस्या सोडविल्या. मी एम ए मराठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्ण केले. आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे खेडकर महाविद्यालयात प्राध्यापकपदी रुजू झालो. पण एक वर्षात मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं . पुन्हा दादांना जाऊन भेटलो. ते म्हणाले . कॉलेजमध्ये काढून टाकण्याचे काही कारण. मी म्हटलं काहीच नाही .तुझं वागणे चांगले आहे .प्रश्नच नाही .मी हसलो. ते हसले. त्यांनी लगेच मला त्यांच्या गाडीत बसविले .

रात्रीची वेळ होती आणि तेव्हाचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब घारपळकर नागपूरला एड.जयस्वाल यांच्याकडे बसले होते . दादा मला तिथे घेऊन गेले आणि सगळा इतिहास त्यांना सांगितला.या मुलाचे वडील आणि माझे वडील एकाच खटल्यात काम करीत होते. या मुलाला अकारण नोकरीवरून काढलं आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतून. हे योग्य नाही .तेव्हा बाबासाहेब घारपळकर म्हणाले. आपल्या शिवाजी सोसायटीमधील एखादं कुठं कॉलेज असेल व तिथे मराठीची जागा असेल तर बघा. तिथे त्यांना रुजू करून घेऊ. मी म्हणालो .आता शक्य नाही. ऑगस्ट महिना आहे .बहुतेक जागा भरल्या गेल्या .अशी विपरीत परिस्थिती .तेव्हा जरी मी काहीसा अपयशी ठरलो. पण खचून गेलो नाही .कारण पाठीशी दादासाहेब होते. पुढेच दादासाहेबांच्याच कृपेने एका चांगल्या महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो.

दादासाहेब म्हणजे ज्ञानवंत,प्रज्ञावंत, प्रतिभावंत व विचारवंत. त्यांना कशाचा मोह नव्हता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होते. दादासाहेब काळमेघ यांचे दुःखद निधन झाले तेव्हा त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होते. एकेकाळी कुलगुरू राहिलेला सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहिलेला व विविध संस्था प्राधिकरण यावर पदे भूषविणारा हा माणूस शेवटी कबीरच होता आणि कबीरच राहिला .आज समाजात देशात कुबेरापेक्षा कबीर मोठा आहे

दादांच्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा संगम होता. दादासाहेब हाडाचे अध्यापक होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संस्थेत शिक्षण घेतलेले त्यांनी काढलेल्या श्रद्धानंद वसतीगृहात राहिलेले व त्यांच्याच श्री शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरी केलेले आणि सर्वात शेवटी त्याच श्री शिवाजी शिक्षण संस्थेत अध्यक्ष झालेले दादासाहेब काळमेघ म्हणजे एक मसीहा होते.

दादासाहेब काळमेघांकडे कोणीही आले तरी त्याला ते जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायचे नाहीत. बरं हे आदरतिथ्य इथे सगळं हृदयापासून असायचं .वरवर नसायचं. वहिनीसाहेब व दादासाहेब यांना घरी आलेला पाहुणा म्हणजे पंढरीचा पांडुरंग वाटायचा. हा माणूस परत आपल्याकडे येतो न येतो आता आलेला आहे तर तो तृप्त होऊनच गेला पाहिजे ही त्यांची आंतरिक इच्छा होती.

त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती .किती वर्ष लोटली तरी ती व्यक्ती त्या व्यक्तीचे गाव त्याचा व्यवसाय व त्याची एकूण परिस्थिती त्यांना आठवत होतीआणि त्याचमुळे दादासाहेबांचा लोकसंग्रह प्रचंड होता.

आमची मराठी प्राध्यापक परिषद आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी प्राध्यापक परिषदेचे दरवर्षी अधिवेशने होतात .एकातरी अधिवेशनाचे अध्यक्षपद दादासाहेबांनी भूषवावे अशी माझी मनोमन इच्छा होती. कारण दादासाहेब मराठीचे तज्ञ होते. संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांना न्याय देणारे खऱ्या अर्थाने माणूस होते. आमच्या मराठी प्राध्यापक परिषदेमध्ये एकदा दादासाहेब आले. प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर यांनी त्यांचे स्वागत केले. चर्चा झाल्या. मराठीच्या अनेक प्रश्नांविषयी दादासाहेबांनी मार्मिक उत्तरे दिली .शंका आणि समाधान केले.

स्वतःच्या मुला मुलींची जेवढी काळजी त्यांनी घेतली नाही तेवढी बहुजन समाजाच्या दुःखी कष्टी दैन्यग्रस्त लोकांच्या मुला मुलींची दादांनी आयुष्यभर काळजी घेतली. सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या शब्दात सांगायचे तर

जरा न थांबलो विश्रांतीला थवा पाहिला मागे

बांधून टाकले प्रीतीचे व कीर्तीचे धागे

असा हा खऱ्या अर्थाने मोठा माणूस. झालेत बहू होतील बहू परंतु या सम हा असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त दादासाहेबांना विनम्र अभिवादन

============

प्राचार्य डॉ. रामदास चवरे

आसावरी

नांदेड सिटी पुणे

.

प्रतिक्रिया व्यक्त करा