ओसरगाव परिसरातील धोकादायक रस्त्याची ग्रामस्थांकडून पाहणी; रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
सिमेंट काँक्रीट पॅचवर्कची मागणी प्रलंबित; अपघातानंतरही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष असल्याचा आरोप
ओसरगाव :
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतरही रस्त्यावरील धोकादायक ठिकाणाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट पॅचवर्क करून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
यासंदर्भात ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी संबंधित ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, दिलीप बिल्डकॉन, महामार्ग वाहतूक पोलीस तसेच इतर संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना न केल्यास कोणत्याही क्षणी ग्रामस्थ व वाहनधारकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या पाहणीवेळी बबली राणे, प्रदीप तळेकर, गजानन तळेकर, प्रमोद कावले, नितीन धुरी, रवी ठाकूर, मारुती वायंगणकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
