चार दिवसांत झाडी हटवा; अन्यथा सा.बां. कार्यालयावर ठिय्या आंदोलनाचा इशारा
वालावल पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम; नेरुर–कवठी व वालावल–हुमरमळा मार्गावरील वाढलेल्या झाडीमुळे अपघातांचा धोका
कुडाळ
वालावल पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून, येत्या चार दिवसांत ती हटविण्यात आली नाही तर कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वालावल पंचायत समितीच्या सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी दिला आहे.
नेरुर–कवठी तसेच वालावल–हुमरमळा या दोन्ही प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचा धोका वाढला असून, या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सौ. बंगे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेविरोधात आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या चार दिवसांत रस्त्यालगतची झाडी हटविण्याची कारवाई झाली नाही, तर रस्त्यावरील तोडलेली झाडी टेम्पोमध्ये भरून थेट कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणून टाकली जाईल. त्यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, असा आक्रमक इशाराही सौ. अर्चना बंगे यांनी दिला आहे.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या चार दिवसांत कोणती पावले उचलतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
