*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आस पंढरीची*
आषाढीच्या वारीमध्ये आस पंढरीची दाटे,
नामघोष तालामध्ये अंतरंग उजळते..
जाते पाऊल चालत श्रद्धा अखंड पालखी,
फुले विठ्ठल नामात जीवनाची मिटे राखी..
गळा तुळशीच्या माळा डोळे शोधती सावळा,
भक्तीच्याच ओलाव्याने होई जीवच कोवळा..
चंद्रभागेतीरी शांत मन धुऊन हळवे,
विठ्ठलाच्या दर्शनास होई हृदय ओलावे..
दिंडीमध्ये चालताना अभंगांची लागे लय,
प्रेमभक्ती सुरांतून होई दु:खांचेही क्षय..
संतवचनांचा दीप उजळतो अंतरात,
कृपाकिरणांनी फुले जीवनाची ही पहाट..
कष्टकरी वारकरी कधी विश्वास ना ढळे,
विठ्ठलाच्या स्मृतीमध्ये भाग्य नव्यानेच फळे..
हात कटेवर ठेवी करुणेच्या सागराचा,
भेट घडावी चरणी तोच निवारा जिवाचा..
वाटेवरी विठू आस हेच अंतरात गाणे,
आस पंढरीची घेता होते पावन जगणे..
देह थके ना ही भाव ठरे नामच आधार,
विठ्ठलचरणी लीन हेच जीवनाचे सार..
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
