कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ भीषण अपघात; दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू
दुचाकी-स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक; आयुषी देसाई यांचा जागीच, तर कार्तिक परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू – चालकाचा पोलीसांकडून शोध सुरू
सावंतवाडी
सावंतवाडी-कुडाळ मार्गावरील कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आयुषी देसाई या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कार्तिक परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) कुडाळच्या दिशेने जात असताना सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH 07 AG 7801) समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या गटारात जाऊन कोसळली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लादू रायका यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र कार्तिक परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर स्विफ्ट कारचा चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार श्री. राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार श्री. धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब पुढील तपास करत आहेत.
