ओसरगाव–कसाल पुलाजवळील खड्डे तातडीने बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थ व वाहनचालक आक्रमक; जीवितहानी झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार, उद्याच दुरुस्तीची मागणी
कणकवली : प्रतिनिधी
मुंबई–गोवा महामार्गावरील ओसरगाव–कसाल पुलाजवळ दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती उद्याच्या दिवसभरात करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थ आणि वाहनचालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत, महामार्गाचे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन, महामार्ग वाहतूक पोलीस तसेच संबंधित शासकीय यंत्रणेकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
याच महामार्गावरून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नियमित प्रवास होत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांसाठी पुढाकार घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ओसरगाव–कसाल पुलाजवळील धोकादायक खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
