सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबिर
खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, बेकरी, किराणा, कॅटरिंगसह सर्व अन्न व्यवसायिकांनी आधारकार्डसह उपस्थित राहण्याचे आवाहन
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्न व्यवसायिकांसाठी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम गुरुवार, दि. २३ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे येथील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्नपदार्थ सल्लागार व प्रशिक्षक अकुंश जोगदंड मार्गदर्शन करणार आहेत. सुरक्षित अन्न, अन्नसुरक्षा नियम, प्रमाणपत्र प्रक्रिया, आरोग्य संरक्षण तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी किराणा दुकानदार, हॉटेल व खानावळ चालक, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स विक्रेते, स्टॉलधारक, मासे, चिकन, अंडी, मटन विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण उत्पादक, भट्टी चालक, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, कॅटरिंग व्यावसायिक, विविध धान्यांपासून पीठ तयार करणारे तसेच पाणी बाटली व पिण्याच्या पाण्याचे विक्रेते अशा सर्व अन्न व्यवसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना आधारकार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.
