You are currently viewing गुरुपौर्णिमेनिमित्त शिल्पग्रामात दशावतारातील गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा सोहळा

गुरुपौर्णिमेनिमित्त शिल्पग्रामात दशावतारातील गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा सोहळा

गुरुपौर्णिमेनिमित्त शिल्पग्रामात दशावतारातील गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा सोहळा

५० वर्षांपूर्वीच्या दशावताराचा खडतर प्रवास उलगडणार; ज्येष्ठ कलावंतांचा गौरव, मुलाखत आणि गाजलेल्या भूमिकांचे सादरीकरण

दोडामार्ग

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फरा प्रतिष्ठान आदर्शगाव केर आणि स्नेहबंध ग्रुप दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतारातील गुरु-शिष्य परंपरा जपणारा विशेष कार्यक्रम बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी येथील शिल्पग्राममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या दशावतार कलेचा खडतर प्रवास, त्या काळातील मेहनत आणि सुवर्णक्षणांचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
आजच्या आधुनिक सुविधांपासून दूर असलेल्या काळात कलाकार पुराणांचा अभ्यास कसा करत होते, रंगभूषा, रंगकाम, प्रवास आणि संवादांची तयारी कशी केली जात होती, याचा उलगडा ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवातून होणार आहे. नवोदित कलाकारांसाठी दशावताराची समृद्ध परंपरा जवळून जाणून घेण्याची ही दुर्मिळ संधी ठरणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन सिंधुदुर्गचे दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आणि कारीवडे येथील हेळेकर दशावतार नाट्य मंडळ यांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दशावतार क्षेत्रातील ऋषितुल्य आणि गुरुतुल्य ज्येष्ठ कलावंत मंगेश राणे, सुरेश गुरव, राधाकृष्ण ऊर्फ बाबली नाईक, संतोष रेडकर आणि आनंद नार्वेकर यांच्या पाद्यपूजन व सत्काराने होणार आहे. त्यानंतर ‘५० वर्षांपूर्वीचा दशावतार : खडतर प्रवास ते सोनेरी क्षण’ या विषयावरील विशेष मुलाखत युवा कलाकार दत्तप्रसाद शेणई यांच्या संवादातून रंगणार आहे.
यावेळी दशावतार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कै. रामचंद्र बाबुराव राणे ऊर्फ बाबा राणे-कोनसकर यांना मरणोत्तर ‘दशावतार स्मृती कलागौरव पुरस्कार’ प्रदान करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ कलाकार त्यांच्या काळातील गाजलेल्या आणि रसिकप्रिय भूमिका सादर करणार असून, त्यांना युवा कलाकारांचीही साथ लाभणार आहे. ज्येष्ठ आणि युवा पिढीचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी दशावतारप्रेमी, नवोदित कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फरा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा