You are currently viewing अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात २२ ते २८ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात २२ ते २८ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात २२ ते २८ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, वारकरी सेवा व ‘अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार’सह विविध उपक्रमांचे आयोजन – महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब

वेंगुर्ले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आठवडाभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांनी दिली.
जनसेवा सप्ताहाची सुरुवात २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे महिला बचत गट सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाने होणार आहे. २३ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, २४ जुलै रोजी वृक्षारोपण, तर २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहाचा समारोप २८ जुलै रोजी होणार असून, तालुक्यातील प्रगतशील महिला व पुरुष शेतकऱ्यांचा ‘अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
नियोजन बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम. के. गावडे, तालुका महिला अध्यक्षा ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्षा सुप्रिया परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहराध्यक्ष सुरज परब, युवती अध्यक्षा निधी शिरोडकर, प्रविणा खानोलकर, तेजस्वी गावडे, मिनाक्षी आरोंदेकर, सौ. तोडकर, सुप्रिया जाधव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा