♦महेश सारंग भाजपाचा सावंतवाडी तालुक्यात प्रत्येकाच्या ओळखीचा, जवळचा चेहरा. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाबरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे ते एक हुशार, कुशल नेतृत्व, एक चांगले संघटक म्हणून उदयास आले.
♦नारायण राणे यांच्यासोबत त्यांचा खंदा समर्थक, शिलेदार म्हणून कित्येकवर्षं काम करतानाच त्यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची छाप पाडली होती. सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते, कित्येक निवडणुकी जिंकून आपली योग्यता सिद्ध केली होती.
पंचायत समिती सदस्य, उपसभापती म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
♦नारायण राणे यांच्या कडून फारकत घेऊन महेश सारंग भाजपात दाखल झाले. तेव्हा वाटलेलं ते राजकारणात चुकलेत, परंतु कोलगाव मतदारसंघात त्यांच्या दांडग्या संपर्कामुळे कित्येक लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत अल्पावधीतच त्यांना संपूर्ण सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी सोपवली. तालुकाध्यक्ष झाल्यावर तर त्यांनी संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात फिरून आपला संपर्क वाढविला. बरेचसे आपले ज्ञातीबांधव, मित्र मंडळी भाजपात प्रवेश करून घेत भाजपाची पाळेमुळे संपूर्ण मतदारसंघात रोवायला सुरुवात केली, प्रत्येक गावात, वाडी वाडीत भाजपाचा कार्यकर्ता निर्माण केला. त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले, याची प्रचिती राजन तेली यांना विधानसभेच्या निवडणुकीत पडलेल्या मतांवरून दिसून आली.
♦महेश सारंग हे जास्त गाजावाजा न करता आपलं कार्य चालू ठेवण्यात पटाईत आहेत. राजकारणाची त्यांना खोलवर जाण आहे. मतदारांची नाडी ते बरोबर ओळखतात, म्हणून प्रत्येकवेळी यश खेचून आणतात. जिल्हापरिषद निवडणुकीत त्यांना अपयश आलेलं, परंतु त्याने डगमगून न जाता, फ़िनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेत आपण राजकारणात किती माहिर आहे हे दाखवून दिले.
♦भाजपात आल्यावर त्यांनी जिल्हापरिषद, पंचायत समिती, विधानसभेत मतांची टक्केवारी वाढविली. जिथे कधीही भाजपाचा उमेदवार उभा नसायचा तिथे उमेदवार उभे करून निवडून आणले, आणि सावंतवाडी तालुक्यात भाजपाचं कमळ फुलविले. बांदा, दोडामार्ग वगळता सावंतवाडी मतदारसंघात भाजपा नगण्यच होती, परंतु महेश सारंग यांनी भाजपाचं अस्तित्व दाखवून दिलेच, आणि भाजपाची सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले.
अलीकडेच सावंतवाडी मतदारसंघात बांदा ग्रामपंचायत सरपंच निवडणूक, आणि सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पोटनिवडणूक पार पडली. अत्यंत महत्वाच्या या दोन्ही निवडणुका चुरशीच्या झाल्या, आणि त्यात महेश सारंग यांच्या नेतृवाखाली दोन्ही ठिकाणी विजय प्राप्त झाला. बांदा ग्रामपंचायत ही भाजपाची मक्तेदारीच आहे, तिथे भाजपा कित्येकवर्षं पाय घट्ट रोवून आहे, परंतु सावंतवाडीत मात्र इतिहास घडला. निलेश राणे, संजू परब यांचंही योगदान होतंच, परंतु महेश सारंग यांचं कुशल नेतृत्व दुर्लक्षून चालणार नाही.
♦आज सावंतवाडीत भाजपाचा विजयी मेळावा आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, सर्व जि. प., पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यात सामील होतील, सर्वांच्या कार्याचं मूल्यमापन होईल, सत्कारही होतील. परंतु महेश सारंग यांच्या सावंतवाडी तालुक्यातील कुशल नेतृत्वाची, उत्तम संघटन कार्याची दखल ही घ्यावीच लागेल.
प्रशंसाही करावी लागेल….!!