२१ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया; रक्तदान, फळवाटप, धान्यवाटप, कबड्डी स्पर्धेसह विविध सामाजिक उपक्रम
सावंतवाडी :
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर होणार असून, या शिबिरात तब्बल २१ आजारांवर मोफत तपासणी, उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.
आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता कविटकर, नगरसेविका सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी, भारती मोरे आदी उपस्थित होते.
संजू परब म्हणाले की, के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर होईल. विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार असून, गरजेनुसार मोफत उपचार व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत.
या शिबिरात हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, पचनसंस्था व पोटाचे विकार, फिजिओथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती, नेत्ररोग, ईसीजी, मेंदू व मज्जासंस्था शस्त्रक्रिया, छाती व श्वसनविकार, कान-नाक-घसा, कर्करोग तपासणी, बालरोग, त्वचारोग, टू-डी इको, मधुमेह आदींसह एकूण २१ आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ते २० जुलै या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलै रोजी सकाळी आमदार केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, त्यानंतर तिन्ही तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना व गरजूंना फळवाटप करण्यात येईल. रक्तदाता संघटना सावंतवाडीच्या वतीने रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तसेच गरीब नागरिकांना धान्यवाटपाचेही आयोजन करण्यात आले आहे. १९ जुलै रोजी विशेष कबड्डी स्पर्धाही होणार आहे.
महिला जिल्हाध्यक्ष ॲड. निता कविटकर यांनी सांगितले की, तिन्ही तालुक्यांमध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फळवाटप, छत्री वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस यंदाही पूर्णपणे सामाजिक उपक्रमांद्वारेच साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
