You are currently viewing मिशन आयएएसचे आधारवड प्राचार्य अण्णासाहेब हिवसे 

मिशन आयएएसचे आधारवड प्राचार्य अण्णासाहेब हिवसे 

 

आज मिशन आयएएस संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे. फक्त एक रुपया प्रतिदिन एवढ्या अल्पशुल्कामध्ये आयएएस सारख्या परीक्षेचे प्रशिक्षण देणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचे हे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून मराठी तसेच इंग्रजी व सेमी या माध्यमातून देण्यात येते. आज हा उपक्रम भारतातील 19 राज्यात यशस्वीपणे सुरू आहे. या उपक्रमाचे खरे आधारवड आहेत ते सुप्रसिद्ध विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावतीचे प्राचार्य बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे.

या उपक्रमाची जेव्हा सुरुवात करायची होती तेव्हा प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांनी खरा पुढाकार घेतला. आताचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकास खारगे तसेच आताचे प्रधान आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार हे 12 मे 2000 रोजी अमरावतीला आले. तेव्हा आमच्याजवळ खरं म्हणजे काहीच नव्हतं. आम्हाला खरी साथ दिली ती अण्णासाहेब हिवसे यांनी. ते आर डी आय के महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले होते. विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे ते कोषाध्यक्ष होते. या सोसायटीमार्फत अभियांत्रिकी महाविद्यालय दंत महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय कला वाणिज्य महाविद्यालय शाळा व विविध उपक्रम त्यावेळी सुरू होते आणि आजही आहेत. अण्णासाहेबांनी पुढाकार घेऊन आमच्या सहकार्याने पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली ती अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळील दंत महाविद्यालयामध्ये.

अण्णासाहेबांनी केवळ आपली महाविद्यालये या कामासाठी उपलब्ध करून दिली नाहीत तर त्यासाठी लागणारा पैसा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला. त्यांच्याजवळ दृष्टी होती. ते मला नेहमी म्हणायचे नरेश काळजी करायची नाही .मी तुझ्या पाठीशी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते मिशनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते.

आम्हाला पुस्तके प्रकाशित करायची होती. पण पैसे नव्हते. पण तोही भार अण्णासाहेबांनी उचलला. एकेक करता करता आज आमची 73 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.पण सुरुवात जी झाली ती अण्णासाहेबांमुळेच. मी एखादा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की ते कधीच नाही म्हणायचे नाही.

अण्णा साहेबांना एक चांगली सवय होती. ती म्हणजे कार्यक्रम असला की ते त्यांच्यातर्फे सर्वांना जेवण द्यायचे. ते म्हणाले विद्यार्थी बाहेरगावी येतात .आपल्या भागातील विद्यार्थ्यांची पेंईग कॅपॅसिटी एवढी नसते .आपण त्यांना जेवण देऊ या. एक वेळ आम्ही बडनेरा येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम ठेवला होता. दैनिक लोकमत युवा मंच आणि मिशन आयएएस असा संयुक्त तो उपक्रम होता. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. अण्णासाहेबांनी 200 लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली होती. मला वाटलं इतके लोक येणार नाहीत.मी अण्णा साहेबांना तसे बोलून दाखविले. अण्णासाहेब म्हणाले काठोळे तुमच्यापेक्षा माझा अनुभव जास्त आहे. म्हटलं. अण्णासाहेब सकाळपासून पाऊस सुरू आहे. बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय हे गावाच्या बाहेर आहे. आणि दळणवळणाची साधने अपुरी आहेत .ते म्हणाले त्याची काळजी करू नका .तुम्ही कार्यक्रम चांगला कसा होईल ते पहा. आणि अण्णासाहेबांचे शब्द खरे ठरले .पाऊस असूनही सभागृह भरले होते. अगदी गोंदियापासून तर बुलढाणा पर्यंत विद्यार्थी या कार्यक्रमाला आले होते. कारण त्या काळात स्पर्धा परीक्षेचे वातावरण आपल्या अमरावतीला विदर्भात पुरेशा प्रमाणात नव्हते.

अण्णा साहेबांनी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी त्यांचे दंत महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्र महाविद्यालय महिला महाविद्यालय समाजकार्य महाविद्यालय आम्हाला उपलब्ध करून दिले. अर्थातच आण्णासाहेब पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला आयोजनाचा खर्च येत नव्हता. आणि येणारे अधिकारी आयएएस अधिकारी असल्यामुळे त्यांचाही खर्च करावा लागत नव्हता. आज मिशन आयएएस जी सशक्तपणे उभी आहे ती अण्णासाहेब हिवसे नावाचा आधारवड आम्हाला गवसला म्हणूनच. त्यांचे चिरंजीव नितीन भाऊ हिवसे व बंडूभाऊ हिवसे हे पण आमच्या उपक्रमात सहभागी व्हायचे .नितीनभाऊंचा सहभाग जास्त राहायचा. अण्णासाहेब गेल्यानंतर देखील नितीन भाऊंनी पण व त्यांचे पुतणे गौरी इनचे संचालक सचिन हिवसे यांनी हा वारसा जोपासला आहे. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात नितीनभाऊ तर्फे तसेच आयएएस सत्काराच्या वेळेस गौरी इनचे सचिन हिवसे ही भोजन सेवा विनामूल्य उपलब्ध करून देतात. अण्णासाहेबांना राजकारणाचा छंद होता. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र नगरसेवक श्री बंडूभाऊ हिवसे हे चालवीत आहेत.

 

आजचे प्रधान आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार यांची माझी सव्वीस वर्षांपूर्वी भेट झाली नसती आणि आजचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले नसते आणि अण्णासाहेबांसारखा आधारवड आम्हाला गवसला नसता तर कदाचित मिशन आयएएस सशक्तपणे महाराष्ट्र मध्ये उभे राहिले नसते.

 

आज अण्णासाहेब आमच्यात नाहीत.पण त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री नितीन हिवसे श्री बंडूभाऊ हिवसे व पुतणे श्री सचिन हिवसे आमच्या पाठीशी उभे राहून पुढे चालवीत आहेत.ही आमच्यासाठी जमेची बाजू होती आहे आणि राहणार आहे.

अण्णासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त हा मानाचा मुजरा .

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा