हेदुस–वाघमळा परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला; 130 वीज ग्राहकांना दिलासा
दोडामार्ग
सासोली–हेदुस–वाघमळा परिसरातील ट्रान्सफॉर्मर मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता अचानक बिघडल्याने तब्बल 130 वीज ग्राहक अंधारात गेले. ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या परिस्थितीची तात्काळ दखल घेत दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचे सचिव भूषण सावंत यांनी सासोली उपकेंद्रात धाव घेत तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी केली.
अभियंता नायर यांच्या उपस्थितीत भूषण सावंत यांनी महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्हा अभियंता वनमारे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता हेदुस–वाघमळा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल केला.
यानंतर अभियंता नायर, वायरमन सिद्धेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाईक तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत युद्धपातळीवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. काम पूर्ण होताच परिसरातील वीजपुरवठा उच्च क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरद्वारे सुरळीत करण्यात आला.
हेदुस–वाघमळा परिसरासाठी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. अखेर भूषण सावंत यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन अल्पावधीतच बसविण्यात आल्याने ग्रामस्थांनी महावितरण प्रशासन व वीज ग्राहक संघटनेचे आभार मानले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व युवानेते अंकुश उर्फ भैया नाईक, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाईक, वीज ग्राहक कृष्णा दळवी, वायरमन सिद्धेश सावंत, अभियंता नायर आदी उपस्थित होते.
नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत होणार असून भविष्यात वारंवार होणाऱ्या बिघाडांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
