You are currently viewing जागतिक सहकार दिनानिमित्त स्नेह नागरी पत संस्थेत सहकार मेळावा उत्साहात

जागतिक सहकार दिनानिमित्त स्नेह नागरी पत संस्थेत सहकार मेळावा उत्साहात

जागतिक सहकार दिनानिमित्त स्नेह नागरी पत संस्थेत सहकार मेळावा उत्साहात

ग्राहक हाच देव मानून सेवा द्या; प्रमुख पाहुणे सुनील राऊळ यांचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

सावंतवाडी 
जागतिक सहकार दिनानिमित्त आज (दि. ४ जुलै) स्नेह नागरी पत संस्था, सावंतवाडी येथे कर्मचाऱ्यांसाठी सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात सैनिक पत संस्थेचे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात सुनील राऊळ यांनी सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्र, स्पष्ट आणि आपुलकीने संवाद साधावा, ग्राहकाला देव मानून त्याचा आदर करावा, असे सांगितले. संस्थेबद्दल तळमळ, कार्यतत्परता आणि आत्मीयता जपल्यास संस्थेच्या प्रगतीसोबत कर्मचाऱ्यांनाही उत्तम मोबदला मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले. स्नेह पत संस्थेची २६ वर्षांची यशस्वी वाटचाल, जनमानसातील विश्वास आणि जिल्ह्यातील अग्रगण्य पत संस्थांमधील स्थान याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू यांनी ग्राहक हा संस्थेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामात उत्कृष्टता राखून संस्थेची चांगली प्रतिमा जनमानसात निर्माण करण्याचे आवाहन केले.

संस्थेचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना, ग्राहकांचा विश्वास संपादन करून ठेवी वाढविणे, चांगले कर्जदार जोडणे आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेद्वारे संस्थेसह कर्मचाऱ्यांचीही आर्थिक व सामाजिक प्रगती साधता येते, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे सुनील राऊळ यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा