करूळ घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प
मुसळधार पावसाचा फटका; रस्त्यावर मातीचा ढिगारा, जेसीबीच्या साहाय्याने मार्ग खुला करण्याचे प्रयत्न
वैभववाडी
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका करूळ घाटाला बसला असून, शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगराचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर कोसळला. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव घाटमार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. परिणामी, घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेली माती व दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
