मुक्ताई ॲकेडमीच्या कॅरम-बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्गातील ९७ विद्यार्थ्यांचा सहभाग; राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी सोनार व आर्बिटर बाळकृष्ण पेडणेकर यांचा गौरव
सावंतवाडी
येथील मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने पाच वर्षांवरील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या या शिबिरात सावंतवाडीसह कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली येथील तब्बल ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन कणकवली येथील प्रसिद्ध सॉफ्टवेअर उद्योजक प्रवीण सोनार यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी गेल्या दहा वर्षांतील ॲकेडमीच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
उद्घाटक प्रवीण सोनार यांनी मुक्ताई ॲकेडमी आणि कौस्तुभ पेडणेकर यांच्या कार्याचे कौतुक करत, गेल्या दशकभरात ॲकेडमीने कॅरम आणि बुद्धिबळ क्षेत्रात अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले असल्याचे सांगितले. ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कारासह विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिबिरात कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम, तर बाळकृष्ण पेडणेकर यांनी बुद्धिबळाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले. यावेळी शालेय व विविध स्तरांवरील स्पर्धा, खेळातील संधी आणि या खेळांचे बौद्धिक फायदे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात कणकवली येथील राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी सोनार हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मुक्ताई ॲकेडमीचा जिल्ह्यातील पहिला बुद्धिबळ राज्य पंच (आर्बिटर) ठरल्याबद्दल बाळकृष्ण पेडणेकर यांचाही गौरव करण्यात आला.
शिबिराच्या समारोपावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने लवकरच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालखेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
