बिबट्याच्या नखांसह वन्यजीवांच्या अवयवांची मोठी तस्करी उघड; न्यायालयाकडून दोन दिवसांची वन कोठडी
कुडाळ / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेतील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वनविभागाने धाडसी कारवाई करत वन्यजीवांच्या अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत ६ बिबट्याची नखे, २० बिबट्यांच्या नखांचे अवयव, २ बिबट्यांचे सुळे (दात) तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ नखे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला अटक करण्यात आली असून, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी सावंतवाडी वनक्षेत्रपालांना कुडाळ येथील मसुरकर जेम्स दुकानात वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या संयुक्त पथकाने पंचांसमक्ष दुकानावर छापा टाकून झडती घेतली.
झडतीदरम्यान वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून त्यापासून तयार केलेले अवयव विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाने प्र.गु.रि. क्र. ०७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा (IFS) व विभागीय वनाधिकारी (दक्षता) संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत वनक्षेत्रपाल सचिन शिडुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल महेश पाटील, सदानंद परब, सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरवत, रवींद्र पाटील, रिषिका होळे, प्रसाद पाटील तसेच चालक राहुल मयेकर आणि नितीन सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
