कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा भाग कोसळला; मोठी दुर्घटना टळली
मुसळधार पावसाचा फटका; नगराध्यक्ष संदेश पारकरांची घटनास्थळी धाव, जीर्ण इमारत हटवून नवीन व्यापारी संकुल उभारणार
कणकवली
नगरपंचायतच्या पटवर्धन चौकालगत असलेल्या जुन्या भाजी मार्केट इमारतीचा काही भाग मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि कोसळलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगरपंचायत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष पारकर म्हणाले की, जुने भाजी मार्केटची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपले आहे. आज झालेल्या घटनेमुळे संभाव्य धोका स्पष्ट झाला आहे. सध्या या इमारतीत अनेक व्यापारी व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ते पुढे म्हणाले की, केवळ डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नाही. सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या व्यवसायाची पर्यायी व्यवस्था केली जाईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबा दुखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिड्ये, भगवान कासले, संगीता जयताळकर, एजाज काझी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाणे, लक्ष्मण महाडिक, सहिद नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपुत, महेश मेस्त्री, निलेश निखार्गे आदी उपस्थित होते.
